पोलिसांचा नखरा नागरिकांच्या चकरा

चतु:शृंगी - पोलिस व्हेरिफिकेशनसाठी पोलिस ठाण्यात रांगेत थांबलेले नागरिक.
चतु:शृंगी - पोलिस व्हेरिफिकेशनसाठी पोलिस ठाण्यात रांगेत थांबलेले नागरिक.

पुणे - 'एम पासपोर्ट सेवा’ हे ॲप सुरू केल्यानंतर पासपोर्ट पोलिस व्हेरिफिकेशनचा कालावधी कमी होण्यात काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी काही पोलिस ठाण्यात नागरिकांच्या तक्रारी मात्र कमी झालेल्या नाहीत. पत्ता बदलला सारख्या किरकोळ कारणावरून पोलिसांकडून पैसे मागितले जातात, टॅब असतानाही पोलिस ठाण्यात बोलाविले जाते अशा तक्रारी होत आहेत, तर ४० पैकी १० टॅब बंदच असल्याने व्हेरिफिकेशन करायचे कसे, असा सवाल पोलिसांकडून होत असल्याने या त्रुटी दूर करण्याची गरज आहे. 

पासपोर्ट पडताळणीचा कालावधी कमी करण्याबाबत पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. ही प्रक्रिया पारदर्शक, गतिमान आणि विश्‍वासार्ह असावी, याकडे लक्ष देण्यात येत आहे. शुक्‍ला यांच्यासह प्रादेशिक पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे आणि पोलिस उपायुक्‍त ज्योतिप्रिया सिंह यांच्याकडून ‘एम’ पासपोर्ट कार्यप्रणाली राबविण्याबाबत अधिकारी - कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. परिणामी नागरिकांची गैरसोय टाळण्यास मदत होत आहे. मात्र, ही प्रक्रिया करताना नागरिक आणि पोलिसांनाही अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. 

घराचा पत्ता बदलण्यासह काही किरकोळ कारणावरून पोलिसांकडून नागरिकांची अडवणूक होत आहे. काही ठाण्यात पोलिस व्हेरिफिकेशनसाठी २१ दिवसांहून अधिक कालावधी लागत आहे. वास्तविक व्हेरिफिकेशनसाठी पोलिसांना सुमारे ४० टॅब देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना ठाण्यात जाण्याची गरज नाही. मात्र १० टॅब बंद असल्याने काही ठिकाणी नागरिकांना ठाण्यात जावे लागत आहे. तर काही ठिकाणी पोलिसांकडून मुद्दामहून अडवणूक करून पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारीही होत आहेत. याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

काही पोलिस ठाण्यांत पारपत्र पडताळणीचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे, तर काही ठिकाणी अजूनही ते संथ गतीने होत आहे. आगामी दिवसांत परिमंडळनिहाय पोलिस ठाण्यातील पारपत्र पडताळणीच्या कामाबाबत अचानक तपासणी केली जाईल. पोलिस घरी जाऊन नागरिकांना ‘एम’ पासपोर्ट सुविधा देत आहेत की नाही, हेही तपासण्यात येईल. परकी नागरिक नोंदणी (एफआरओ) कार्यालयात विविध देशांमधून आलेल्या नागरिकांची गर्दी असते. परदेशांतील नागरिकांच्या मनात आपल्या देशाची चांगली प्रतिमा निर्माण करण्याबाबत प्रयत्न करण्यात येत आहेत. 
- ज्योतिप्रिया सिंह,
 पोलिस उपायुक्‍त, एफआरओ.

पासपोर्ट पडताळणीतील टप्पे 
अर्जदाराकडून पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज
पासपोर्ट कार्यालयात कागदपत्रे जमा करण्यासाठी मुलाखत तारीख मिळते.
मुलाखतीनंतर अर्जदाराची फाइल क्रमांकासह संबंधित पोलिस ठाण्यात ऑनलाइन रवाना
पोलिसांच्या मोबाईल टॅबवर अर्जदाराचा फाइल क्रमांक येतो. त्यानुसार, पोलिस घरी जाऊन कागदपत्रांची पडताळणी करतात. तसेच समक्ष छायाचित्र काढून कागदपत्रे स्कॅनिंग करून मान्यतेसाठी ऑनलाइन पुढे पाठवितात.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक ऑनलाइन पडताळणी करून पुढे शिफारस करतात
पोलिस उपायुक्‍त विशेष शाखा-दोन कार्यालयात अर्जदारावर गुन्हा दाखल आहे का, हे तपासले जाते.
तेथून तो अहवाल प्रादेशिक पारपत्र कार्यालयास ऑनलाइन पाठवला जातो
अहवाल प्राप्त होताच पासपोर्ट छपाईसाठी पाठविला जातो. त्या वेळी अर्जदाराच्या मोबाईलवर संदेश पाठविला जातो.

पोलिस आयुक्‍तांच्या सूचना  
किरकोळ कामांसाठी उशीर करू नका
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खबरदारी घ्या
एकाच वेळेस पडताळणी न झाल्यास किमान दोनदा घरी जा 
नागरिकांना फोन करून त्यांच्या वेळेनुसार जा 
पारपत्र पडताळणीसाठी पैसे घेऊ नका

‘एम’ पासपोर्ट सुविधेचा उद्देश
पडताळणी प्रकियेत लागणारा कालावधी कमी करणे
मोबाईल टॅबद्वारे पडताळणी प्रक्रिया पारदर्शक
नागरिकांना पोलिस ठाण्यात जाण्याची गरज नाही
कागदपत्रांची पडताळणी, छायाचित्र स्कॅनिंग घरीच
पोलिसांना नागरिकांच्या घरी जाणे बंधनकारक
‘जीपीआरएस सिस्टिम’द्वारे पत्त्याची पडताळणी

‘एम’ पासपोर्टमुळे फायदा
ही कार्यप्रणाली सुरू होण्यापूर्वी पडताळणीसाठी किमान २१ दिवसांचा कालावधी लागत असे. तसेच पारपत्रांसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या अधिक होती. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अर्ज प्रलंबित राहण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र ‘एम’ पासपोर्ट सुविधा सुरू झाल्यानंतर पडताळणीचा कालावधी आठ ते दहा दिवसांवर आला आहे. 

अर्जदार घरी मिळत नाही
मुंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक प्रशांत भाट आणि भरत उर्किडे म्हणाले, ‘‘पारपत्र पडताळणीसाठी घरी गेल्यानंतर कधी अर्जदार तेथे राहात नाही. काहीजण नोकरीस जातात, तर काही फोन उचलत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा जावे लागते. अर्ज भरल्यानंतर त्यांच्याकडे पुराव्यासाठी कागदपत्रांची झेरॉक्‍स नसते. त्यासाठी अर्जदारास पोलिस ठाण्यात बोलवावे लागते.’’  

‘एम’ पासपोर्टपूर्वी 
१ जानेवारी २०१६ ते ३० मे २०१६
प्राप्त प्रकरणे- एक लाख ४० हजार
२१ दिवसांच्या आत पडताळणी : ५४ हजार ६००
२१ दिवसांनंतर प्रलंबित पडताळणी :  ८५ हजार ४००
प्रमाण ६१ टक्‍के 

‘एम’ पासपोर्टनंतर 
१ जानेवारी २०१७ ते ३१ मे २०१७ 
प्राप्त प्रकरणे- ७८ हजार ४००
२१ दिवसांच्या आत पडताळणी ः  ७० हजार 
२१ दिवसांनंतर प्रलंबित पडताळणी ः ८ हजार ४०० 
प्रमाण ८९ टक्‍के

२१ दिवसांहून अधिक प्रलंबित प्रकरणे असलेली पोलिस ठाणी : हडपसर, चतु:शृंगी, विमानतळ, वानवडी

२१ दिवसांत ‘झिरो पेडेन्सी’ असलेली पोलिस ठाणी : कोंढवा, वाकड, सिंहगड रस्ता, चंदननगर, कोथरूड, विश्रामबाग, येरवडा, चिंचवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com