ज्येष्ठ घेताहेत ‘ॲन्ड्रॉइड’द्वारे प्रशिक्षण

ज्येष्ठ घेताहेत ‘ॲन्ड्रॉइड’द्वारे प्रशिक्षण

पुणे  - ‘यू ट्यूब’ व मधुबाला, महम्मद रफींची गाणी पाहायची, बॅंकांच्या मुदत ठेवीचे दर पाहायचे, व्हॉट्‌सॲपवरून एकमेकांना संपर्क करायचा, गुगल सर्च करून लोकेशन पाहायचे... एवढेच काय! रेल्वे वा विमान तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग करायचे, तेही मोबाईलवरून. इंटरनेटच्या जमान्यात ज्येष्ठ नागरिकही स्वतःहून ॲन्ड्रॉइड मोबाईल (स्मार्ट फोन) ऑपरेट करण्यासंबंधीचे प्रशिक्षण घेऊ लागले आहेत. ज्येष्ठ नागरिक संघातर्फेही ज्येष्ठच ज्येष्ठांना यानिमित्ताने प्रोत्साहित करीत आहेत. 

आधुनिक काळात ज्येष्ठही आता तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊ लागले आहेत. ज्येष्ठ नागरिक संघाचे अनेक सदस्य हे एकाकी जगत आहेत. तर, वृद्ध जोडपीही एकाकीपणाने कंटाळलेली दिसतात. त्यांना त्यांची कामे स्वतः करता यावीत, नातेवाईक, मित्र- मैत्रिणींशी मोकळेपणाने संवाद साधता यावा, एकाकीपणाची भावना दूर व्हावी, मन प्रसन्न राहावे, इच्छा- आकांक्षांना मोकळीक मिळावी, यासाठी मोबाईलचे माध्यमही सकारात्मक भूमिका बजावत आहे. सोशल मीडियाचाही या माध्यमातून ज्येष्ठ वापर करू लागले आहेत. 

मोबाईलमधील फीचर्स कोणती? टू जी, थ्री जी, फोर जी नेटवर्किंग प्लॅन म्हणजे काय? फेसबुक, इन्स्टाग्राम म्हणजे काय? यासारखे अनेक प्रश्‍न विचारून
जिज्ञासू ज्येष्ठ नागरिकही उत्साहाने मोबाईल ऑपरेटिंगचे प्रशिक्षण घेऊ लागल्याचे निरीक्षण प्रशिक्षणार्थी नोंदवीत आहेत. कॅबचे बुकिंग असो, की पेटीएमद्वारे व्यवहार असोत, ॲपवरून बॅंकिंगचे व्यवहार असोत, ज्येष्ठही उत्साहपूर्वक याविषयीची माहिती घेत आहेत आणि मोबाईलद्वारे व्यवहार करीत आहेत. उच्चशिक्षित ज्येष्ठ नागरिकांचा शिकण्याकडे विशेष कल दिसून येत आहे. मात्र त्यातही महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. विशेषत्वाने साठ ते एकोणसत्तर वयोगटातील ज्येष्ठ जिज्ञासूवृत्तीने स्मार्टफोनमधील फंक्‍शन जाणून घेऊ लागले आहेत. मात्र, मोबाईल बॅंकिंगचा वापर करण्यात मध्यमवर्गीय ज्येष्ठ नागरिक अजूनही चाचपडत असल्याचे निरीक्षण एनजीओंनी सर्वेक्षणाद्वारे नोंदविले आहे.   

मोबाईल ऑपरेट कसा करायचा याबद्दल अनेकदा इच्छा असून आजी- आजोबांना शिकता येत नाही. नोकरी- व्यवसायामुळे मुलांना, घरातल्या व्यक्तींनादेखील ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल शिकवायला फारसा वेळ नसतो. यासंबंधीची जबाबदारी ज्येष्ठ नागरिक संघ, सामाजिक संस्था उचलू लागल्या आहेत. ज्येष्ठांसाठी मोबाईल हाताळणे सोपे व्हावे, याकरिता ‘एनजीओ’द्वारे त्यांना मोबाईलच्या इतिहासापासून माहिती देण्यात येते. 
प्रशिक्षक नंदकुमार सकट म्हणाले, ‘‘तांत्रिक बाबी समजून घेण्यात ज्येष्ठांना थोडा वेळ लागतो; परंतु आपणही कोणावर अवलंबून नाही. आपल्यालाही जमेल या भावनेने ज्येष्ठही मोबाईल हाताळायला शिकू लागले आहेत. की-बोर्डद्वारे मराठी टायपिंगही करतात. एखाद्या बॅंकेच्या मुदत ठेवीच्या व्याजदराची माहितीही गुगल सर्च करून घेतात. यावरून हळूहळू त्यांचाही कल आधुनिकतेकडे वळू लागल्याचे दिसते.’’

सोशल मीडियाद्वारे ज्येष्ठ त्यांचा एकाकीपणा घालवू शकतात. व्हॉट्‌सॲप ग्रुपद्वारे एकमेकांशी संपर्क साधू शकतात. मोबाईलद्वारे छायाचित्र काढणे, ई-मेल पाठविणे, फेसबुक पाहणे, अकाउंट ओपन करणे, याबाबत ज्येष्ठ जाणून घेऊ लागले आहेत.
- सुशांत सोनावणे, प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com