एक वर्ष "ब्रेक' घेऊन थेट बारावीची परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

अकरावीत मनाजोगे महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांची भावना

अकरावीत मनाजोगे महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांची भावना
पुणे - अकरावीला मनासारखे महाविद्यालय मिळाले नाही वा मिळालेले महाविद्यालय जाण्या-येण्यासाठी गैरसोयीचे असल्यास विद्यार्थी आता सतरा क्रमांकाचा अर्ज भरून थेट बारावीची परीक्षा देण्याचा विचार करीत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षीपासून "मुक्तशाळा'देखील (ओपन स्कूल) उपलब्ध होणार आहे.

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने अकरावी प्रवेशासाठी घेतलेल्या नियमित चार फेऱ्यांनंतरही असंख्य विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले नाही. दहावीत मिळालेले गुण आणि विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयांचे कटऑफ जुळले नसल्याने ही स्थिती उद्‌भवली. अशा विद्यार्थ्यांची संख्या दोन हजारांहून अधिक होती. या विद्यार्थ्यांना खुल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळाली. तरीही काही विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे महाविद्यालय मिळालेले नाही.

परिणामी, अनेक विद्यार्थी एक वर्ष थांबून सतरा क्रमांकाचा अर्ज भरून थेट बारावीची परीक्षा देण्याच्या मनःस्थितीत आहेत. काही विद्यार्थ्यांनी तसा निर्णयही घेतला आहे. दहावीत 64 टक्के गुण पडलेल्या एक विद्यार्थ्याने "सकाळ'शी बोलताना सांगितले, की शहराच्या मध्यवस्तीत राहात असल्याने याच परिसरातील कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशासाठी हवे होते. मात्र, कोणत्याच फेरीत महाविद्यालय मिळाले नाही. त्यामुळे आता सतरा नंबरचा अर्ज भरून बारावीची परीक्षा देणार आहे.

विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव बी. के. दहिफळे म्हणाले, 'दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी प्रवेश घ्यायचा नसेल, तर एक वर्षाचा खंड घेऊन बारावीच्या परीक्षेसाठी सतरा क्रमांकाचा अर्ज भरता येतो. ऑगस्ट महिन्यात हे अर्ज भरण्यास सुरवात होते. त्यानंतर मार्च महिन्यात होणारी परीक्षा विद्यार्थ्यांना देता येते.''

पुढील वर्षीपासून विद्यार्थ्यांना "मुक्तशाळा' या संकल्पनेद्वारे कुठेही प्रवेश न घेता परीक्षा देता येणार आहे. याबाबत राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे म्हणाले, 'कोणत्याही कारणास्तव शाळेत जाता आले नाही, अशा व्यक्तींना सतरा क्रमांकाच्या अर्जाप्रमाणे मुक्तशाळा उपलब्ध होईल. त्याचा अभ्यासक्रम तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील वर्षीपासून ही संकल्पना राबविली जाईल.''

सतरा क्रमांकाचे आलेले अर्ज -
दहावीसाठी : 44701
बारावीसाठी : 48763

Web Title: pune news one year break and direct hsc exam