कांद्याचे भाव वधारले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

पुणे - कर्नाटकातील कांद्याच्या उत्पादनावर झालेला परिणाम आणि महाराष्ट्रात परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीमुळे कांद्याचे घाऊक बाजारातील भाव वधारले. त्यामुळे गेल्या आठवडाभरात किरकोळ विक्रीत कांद्याच्या प्रतिकिलोच्या भावांत पाच रुपयांनी वाढ झाली.

पुणे - कर्नाटकातील कांद्याच्या उत्पादनावर झालेला परिणाम आणि महाराष्ट्रात परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीमुळे कांद्याचे घाऊक बाजारातील भाव वधारले. त्यामुळे गेल्या आठवडाभरात किरकोळ विक्रीत कांद्याच्या प्रतिकिलोच्या भावांत पाच रुपयांनी वाढ झाली.

ऑक्‍टोबर महिन्यात हळवा कांद्याचा हंगाम सुरू होतो. पुणे आणि नगर जिल्ह्यात याचे उत्पादन होते. परतीच्या पावसाचा फटका या कांद्याच्या उत्पादनाला बसला. शेतात पाणी साठल्याने काढणीला आलेला कांदा सडला. काही मालाची प्रतही खराब झाली. त्यामुळे बाजारात नवीन कांद्याची आवक कमी प्रमाणात होत आहे. हंगामाच्या सुरवातीलाच अशी परिस्थिती झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नवीन कांद्याची प्रत चांगली नसल्याने जुन्या कांद्याची मागणी एकदम वाढल्याने कांद्याच्या भावात गेल्या आठवड्यात तेजी निर्माण झाली. 

मार्केट यार्ड येथील कांद्याचे घाऊक व्यापारी विलास रायकर म्हणाले, ‘‘परतीच्या पावसाचा फटका हे महत्त्वाचे कारण आहे. साधारणपणे या कालावधीत कर्नाटकातील कांद्याची पुण्याच्या बाजारात आवक होत असते. कर्नाटकात कांद्याचा हंगाम या वर्षी नुकसानीचा ठरला आहे. तेथे सुरवातीला पाऊस पडला नाही, परतीच्या पावसाने हाती आलेल्या कांदा उत्पादनावर परिणाम झाला. कर्नाटकातील कांदा या कालावधीत बाजारात येत असल्याने भाव नियंत्रणात राहतात. या वर्षी ही स्थिती राहणार नाही. आपल्याकडेही परतीच्या पावसाने कांद्याचे नुकसान केले. यामुळे आता नवीन कांद्याची मागणी घटून जुन्या कांद्याची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने जुन्या कांद्याचे भाव वधारले.’’

कांद्याचा पुढील हंगाम हा डिसेंबर, जानेवारी महिन्यात सुरू होईल. तोपर्यंत जुन्या कांद्याच्या भावात तेजी राहण्याची शक्‍यता आहे. पुण्यातील बाजारात सोमवारी प्रतिकिलोला ३२ ते ३८ रुपये इतका भाव मिळाला आहे. किरकोळ विक्री साधारणपणे ३५ ते ४५ रुपये किलो दराने केली जात आहे. दिवाळीच्या कालावधीत फक्त पुण्यातील बाजार सुरू असल्याने येथील बाजारातून कांद्याची खरेदी वाढली. त्याचाही परिणाम भावावर झाल्याचे मत व्यापारी मांडत आहेत. नाशिक येथील बाजार दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू झाला असून, इतरही बाजार लवकरच सुरू होतील. त्यामुळे पुण्यातील बाजारात वाढलेले मागणीचे प्रमाण कमी होऊ शकते.

Web Title: pune news onion rate increase