केवळ भाषणांनी देश बदलणार नाही - अण्णा हजारे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

पुणे - ‘‘लोकांच्या पोटात अन्न नाही आणि तुम्ही नुसतीच भाषणे करता आहात. नुसत्या भाषणांतून देश बदलणार नाही. त्यासाठी दिलेल्या शब्दांना कृतीची जोड हवी’’, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली. चांगले लोकप्रतिनिधी आणि अधिकारी तयार होण्यासाठी सर्व राज्यांमध्ये प्रशिक्षण केंद्र स्थापन झाले पाहिजेत. यासाठी पंतप्रधानांना पत्र पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘एमआयटी’तर्फे आयोजित सोहळ्यात ‘यूपीएससी’मध्ये देशात पहिली आलेली नंदिनी के. आर. (कर्नाटक), देशात तिसरा आलेला रोनांकी गोपालकृष्ण (आंध्र प्रदेश), पुण्यात पहिली आलेली विश्‍वांजली गायकवाड यांच्यासह देशातील ‘यूपीएससी टॉपर्स’चा हजारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डी. पी. अगरवाल, ‘एमआयटी’चे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड, प्रा. राहुल कराड, पोलिस आयुक्त महेश भागवत (तेलंगण) उपस्थित होते.

हजारे म्हणाले, ‘‘हल्लीची पिढी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पैशांच्या मागे धावत आहे. या धावण्याच्या स्पर्धेतच खरा आनंद, असे वाटू लागले आहे; पण खरा आनंद तर लोकांची सेवा करण्यात असतो. मी माझे अख्खे जीवन या सेवेसाठी दिलेले आहे. यातून मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. त्यासाठीच मी लग्नसुद्धा केलेले नाही. सध्या अनेकांना ‘अण्णा हजारे’ व्हावेसे वाटत आहे. ही चांगली गोष्ट आहे; पण माझ्यापेक्षाही मोठे व्हा. शुद्ध आचार-विचार, निष्कलंक जीवन, त्याग करण्याची वृत्ती ठेवाल तर देश नक्कीच उभा राहील.’’

तुम्ही गरीब आहात की श्रीमंत, तुमचा समाज कुठला, भाषा कोणती हे या परीक्षेत पाहिले जात नाही. तुम्ही प्रयत्न किती करता यावरच यश मिळते, असे अगरवाल यांनी सांगितले.

मोठे साहेब नव्हे; मोठे नोकर
‘‘स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होता, खुर्चीवर बसता त्या वेळी तुम्ही ‘मोठे साहेब’ झालात, असे अनेकांना वाटते. खरंतर तुम्ही त्या वेळी ‘मोठे नोकर’ झालेला असता. अधिकारी हे जनतेचे नोकर असतात. त्यांनी जनतेच्या प्रत्येक प्रश्‍नांकडे हृदयातून पाहायला हवे’’, असे एन. गोपालस्वामी यांनी सांगितले. प्रामाणिक अधिकाऱ्यांची टक्केवारी पाच-दहा टक्‍क्‍यांच्या घरात आहे. ती शंभरपर्यंत जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जीवनाच्या वाटचालीत यश-अपयश येतच असते; पण त्यातून आपण काय मिळवतो, हे महत्त्वाचे असते. ही मिळवण्याची क्रिया सतत चालू राहावी.
- नंदिनी के. आर., ‘यूपीएससी’त देशात पहिली

Web Title: pune news Only by speeches will the country not change