ससूनमधील "ओपीडी' येणार एकाच ठिकाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

पुणे - ससून रुग्णालयात सध्या वेगवेगळ्या इमारतींमध्ये असलेले बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) एकाच ठिकाणी आणले जाणार असून, त्यामुळे एकाच ठिकाणी रुग्णांना सेवा देणे शक्‍य होईल. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा त्रास कमी होण्यास यामुळे मोठी मदत मिळेल, असा विश्‍वास ससून रुग्णालय प्रशासनातर्फे बुधवारी व्यक्त करण्यात आला.

शहरातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न ससून रुग्णालय, श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि भारती वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यामुळे येथील वैद्यकीय व्यवस्थेवर ताण येतो. याबाबतची पाहणी करून "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर ससून रुग्णालयाच्या वेगवेगळ्या इमारतींमधील बाह्यरुग्ण विभाग एकाच छताखाली आणण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येत आहे.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. योगेश गवळी म्हणाले, 'ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार, बालरोग, शस्त्रक्रिया अशा विभागांशी संबंधित बाह्यरुग्ण विभाग विविध इमारतींमध्ये आहे. यामुळे विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्णांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागत असते. यासाठी रुग्णालयातर्फे सर्व विभागांच्या ओपीडी एकाच छताखाली आणल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर रुग्णालयाची प्रयोगशाळा आणि विविध वैद्यकीय चाचण्यांची केंद्रेदेखील बाह्यरुग्ण विभागाच्या शेजारीच सुरू केली जाणार आहेत. यामुळे रुग्णांना संबंधित चाचण्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागणार नाही. त्यातून रुग्णांचा त्रास कमी होणार आहे.''
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, 'ससून रुग्णालयात वेगवेगळे 14 बाह्यरुग्ण विभाग आहेत. त्यांचे एकत्रीकरण करण्याचे काम सुरू आहे.'

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news opd in sasoon hospital