आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये नवउद्योजकांना संधी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

मोठे रुग्णालय वा छोटे क्‍लिनिकला यापुढील काळात तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. डिजिटायझेशनच्या युगात आरोग्य  क्षेत्रातही तंत्रज्ञानामुळे मोठे बदल होत आहेत. ‘नॅशनल डिजिटल हेल्थ ॲथॉरिटी’ स्थापन करून वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास, अंमलबजावणी आणि नियमन करण्याचा सरकारचा विचार आहे.

सरकारी किंवा खासगी रुग्णालयात आपल्याला सर्वप्रथम ‘केस पेपर’ काढायला सांगितले जाते. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये पूर्ण संगणकीकरण झाले असले, तरी त्याचा फायदा रुग्णांना कमीच होतो. रुग्णालयांतर्गत प्रक्रिया संगणकीकृत झाल्या असूनही, रुग्णावरील उपचार, आजार किंवा रोगाचे निदान आणि त्यासंबंधात बरीचशी प्रक्रिया ‘कागदावरच’ होते. तंत्रज्ञान उपलब्ध असले, तरी त्याचा वापर न करण्याकडेच बहुतांश व्यवस्थापनांचा कल दिसतो. त्यामागच्या आर्थिक गणितांकडे दुर्लक्ष केल्यास यापुढील काळात तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रुग्णालयांना लागू गोष्ट छोट्या क्‍लिनिकलाही लागू पडते. 

बदलत्या तंत्रज्ञानामध्ये आता भर पडली आहे ती मशिन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि डेटा ॲनॅलिटिक्‍सची. ‘राष्ट्रीय आरोग्य धोरण २०१७’मध्ये (https://www.nhp.gov.in/NHPfiles/national_health_policy_2017.pdf ) या नव्या तंत्रज्ञानाचा विचार करण्यात आला आहे. ‘नॅशनल डिजिटल हेल्थ ॲथॉरिटी’ स्थापन करून वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास, अंमलबजावणी आणि नियमन करण्याचा सरकारचा विचार आहे. त्याचबरोबर ‘इलेक्‍ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड’ (ईएचआर), ‘मेटाडेटा व डेटा स्टॅंडर्ड’च्या आधारे राज्य व राष्ट्रीय पातळीवर सार्वजनिक व खासगी क्षेत्रात आरोग्यसेवा पुरवणाऱ्यांना संगणकीय प्रणालीद्वारे जोडण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नॅशनल हेल्थ इन्फर्मेशन नेटवर्क, हेल्थ इन्फर्मेशन एक्‍स्चेंज प्लॅटफॉर्म तसेच रुग्ण, आरोग्यसेवा, पुरवठादार, आजार किंवा रोग आदींची ‘रजिस्ट्री’ निर्माण करण्यात येणार आहे. थोडक्‍यात, डॉक्‍टरांच्या प्रिस्क्रिप्शनपासून रोगनिदानासाठी करण्याच्या चाचण्या, रुग्णांचे वैद्यकीय तपशील आणि विम्याची प्रकरणे ही डिजिटल होणार आहेत. 

‘डिजिटायझेशन’च्या या प्रक्रियेमध्येच नवउद्योजकांसाठी अनेक संधी दडल्या आहेत. सरकारने केलेल्या माहिती-तंत्रज्ञानासाठीच्या एकूण तरतुदीपैकी फक्त १० टक्के खर्च रुग्णालयांमध्ये केला जातो. डॉक्‍टरांसह पायाभूत सुविधांची कमतरता आणि महागडी आरोग्य सेवा या दोन प्रमुख आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब महत्त्वाचा ठरेल. ईएचआर, वैद्यकीय पायाभूत सुविधा, व्यवस्थापन आणि रोगनिदानाच्या क्षेत्रात काही स्टार्टअप सध्या काम करत आहेत. त्यांच्यापुढे आव्हानांबरोबरच मोठी बाजारपेठही आहे. ही बाजारपेठ भारतीय स्टार्टअपने काबीज न केल्यास परदेशी कंपन्या वाव मिळेल. तसे होऊ द्यायचे नसल्यास भारतीय नवउद्योजकांनी आरोग्यसेवा क्षेत्रातील या संधीचे सोने केले पाहिजे.

Web Title: pune news Opportunities for new entrants in healthcare sector