घरातील पुस्तके देणगी म्हणून देण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

'पुणे बुक फेअर'मध्ये योजना; विविध भाषेतील पुस्तकांचा खजिना होणार खुला

'पुणे बुक फेअर'मध्ये योजना; विविध भाषेतील पुस्तकांचा खजिना होणार खुला
पुणे - तुमच्या घरात भरपूर पुस्तके आहेत; पण त्यांची देखभाल करणे शक्‍य नाही किंवा ही पुस्तके वाचून झाली आहेत... अशा पुस्तकांचे पुढे करायचे काय, असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल, तर ही सगळी पुस्तके तुम्ही देणगी म्हणून देऊ शकता. तुमची ही पुस्तके राज्यभरातील विविध ग्रंथालयांच्या माध्यमातून गरजू वाचकांपर्यंत पोचली जाणार आहेत. यासाठी माध्यम म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घेतला आहे.

गणेश कला क्रीडा मंच येथे 11 ते 15 ऑक्‍टोबर दरम्यान "16वे पुणे बुक फेअर' आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषद, ग्रंथालय संचालनालय, पुणे जिल्हा परिषद, भाषा संवर्धन समिती व आकाशवाणी यांनी सहकार्य केले आहे. या प्रदर्शनात पुस्तकांची देणगी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र दालन उभे केले जाणार आहे. तेथे वाचकांना पुस्तके जमा करता येतील. ही पुस्तके पन्नास, शंभर वर्षे पूर्ण केलेल्या महत्त्वाच्या ग्रंथालयांना आणि पुस्तकांची आवश्‍यकता असलेल्या इतर ग्रंथालयांना देण्यात येणार आहेत, असे परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.

'पुणे बुक फेअर'चे आयोजक पी. एन. आर. राजन म्हणाले, 'मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी, उर्दू, संस्कृत अशा वेगवेगळ्या भाषांतील आणि वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके प्रदर्शनात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पुस्तकांबरोबरच मासिके, साप्ताहिके, वृत्तपत्रेही असतील. देशाच्या वेगवेगळ्या भागातील प्रकाशकांचे 70, तर मराठी प्रकाशकांचे 30 स्टॉल प्रदर्शनात असतील. प्रदर्शनाचे उद्‌घाटन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते 11 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर प्रदर्शनात दररोज साहित्यविषयक कार्यक्रम होणार आहेत.'' प्रदर्शन सकाळी अकरा ते रात्री आठपर्यंत खुले असेल.

सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
'पुणे बुक फेअर'च्या निमित्ताने महापालिकेच्या तीनशे शाळांत आणि तीस खासगी शाळांत "सुंदर हस्ताक्षर स्पर्धा' घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत हजारो विद्यार्थी सहभागी होणार असून, त्यातील दोन हजार विजेत्या विद्यार्थ्यांना "पुणे बुक फेअर'मध्ये गौरविले जाणार आहे,'' अशी माहिती महापालिकेच्या भाषा संवर्धन समितीचे सदस्य अनिल गोरे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार यांनी दिली.

Web Title: pune news The opportunity to give home books as donations