जिग्नेश मेवाणी यांच्या कार्यक्रमाला विरोध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

पुणे - गुजरातमधील युवा नेता आणि आमदार जिग्नेश मेवाणी आणि दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या उपस्थितीत शनिवारवाडा येथे होणाऱ्या कार्यक्रमाला समस्त हिंदू समितीने बुधवारी विरोध केला. याबाबत महापौर मुक्ता टिळक यांना पत्र दिले. दरम्यान, शनिवारवाड्याचे पटांगण देण्याच्या अटीचा भंग होत असेल तर ते देऊ नये, अशी सूचना महापौर टिळक यांनी महापालिका प्रशासनाला केली.

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या पेशवे व इंग्रज यांच्यातील लढाईला दोनशे वर्षे पूर्ण होत असल्याने शौर्य प्रेरणा दिन अभियानाचे आयोजन केले आहे.

त्यासाठी जिल्ह्यातील विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे. त्यानिमित्त येत्या 31 डिसेंबरला शनिवारवाडा येथे एल्गार परिषद घेण्यात येणार आहे. त्याकरिता आमदार मेवाणी यांना निमंत्रित करण्यात आले. तसेच, खालिद यांच्यासह रोहित वेमुलाची आई राधिका वेमुलाही उपस्थित राहणार आहेत. मात्र, अशा प्रकारच्या कार्यक्रमांना शनिवारवाड्याचे पटांगण देऊ नये, अशी मागणी आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी महापौरांकडे केली आहे. हे पटांगण राजकीय कारणांसाठी देण्यास परवानगी देऊ नये, असा महापालिकेचा ठराव आहे. त्यामुळे हा कार्यक्रम राजकीय असल्याने परवानगी त्वरित रद्द करावी, असेही एकबोटे यांनी म्हटले आहे.

Web Title: pune news oppose to jignesh mevani event