मिळकतकर वाढविण्याच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय विरोध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

पुणे - महापालिकेच्या मिळकतकरवाढीला सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करण्याची भूमिका घेतल्यामुळे प्रशासनाचा दुरुस्त प्रस्ताव सादर होण्याची शक्‍यता मावळली आहे. दरम्यान, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही या दरवाढीला विरोध दर्शविला आहे.

मिळकतकरात 15 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने नुकताच सादर केला होता; परंतु स्थायी समितीच्या 8 जानेवारीच्या बैठकीपूर्वीच तो दुरुस्त करायचा असल्याचे सांगत प्रशासनाने परत घेतला. दुरुस्त प्रस्ताव लवकरच सादर करणार, असे सूतोवाच त्यांनी केले होते; परंतु पाणीपट्टीतही यंदा सुमारे 12 टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांवर करवाढीचा दुहेरी प्रस्ताव लादल्यास असंतोष निर्माण होईल, अशी भीती भारतीय जनता पक्षाच्या अनेक सदस्यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे. त्याची दखल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे मिळकतकरवाढीस विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

याबाबत महापालिका अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. त्यात त्यांनी करवाढीला विरोध दर्शविला आहे. डॉ. धेंडे म्हणाले, 'पाणीपट्टी वाढत असताना मिळकतकर वाढविणे नागरिकांवर अन्यायकारक होईल. त्यामुळे ही करवाढ टाळणे गरजेचे आहे.

महापालिकेला निधीची कमतरता पडत असेल तर, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून राज्य अथवा केंद्र सरकारकडे मदत मागता येईल.'' सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला हाताशी धरून करवाढ केली तर, आम्ही तीव्र विरोध करू, असेही डॉ. धेंडे यांनी सांगितले.

Web Title: pune news oppose to property tax proposal