एलबीटीची थकबाकी वसूल करण्याचा आदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

पुणे - स्थानिक संस्था कराची (एलबीटी) थकबाकी आणि त्यावरील दंडाची रक्कम न भरणाऱ्या व्यावसायिकांविरोधात आता महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. थकबाकीची ही रक्कम मिळकतकरात वर्ग करून ती वसूल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आदेश काढला आहे.

राज्य सरकारने ऑगस्ट 2015 पासून कररचनेत बदल केल्याने 50 कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांकडून "एलबीटी' घेतला जातो. त्यानुसार शहरातील व्यापाऱ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यात काही व्यावसायिकांकडे थकबाकी आणि त्यावरील दंडाची रक्कम असल्याचे स्पष्ट झाले आहे. वारंवार नोटिसा देऊनही थकबाकी भरली जात नसल्याचे आढळून आले आहे. अशा व्यावसायिकांकडील थकबाकी वसूल करण्याच्या उद्देशाने महापालिका प्रशासनाने आता मोहीम उघडली आहे. त्याचाच भाग म्हणून "एलबीटी'ची थकबाकी व्यावसायिकांच्या मिळकतकरात वर्ग करावी, असा लेखी आदेश कुणाल कुमार यांनी दिला आहे. त्यावर आता तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, 'करआकारणी व संकलन विभागाकडून "एलबीटी'ची थकबाकी वसूल केली जाणार आहे. त्यामुळे थकबाकी असलेल्या व्यावसायिकांनी ती भरावी.''

Web Title: pune news order for lbt arrears recovery