अवयवदानाची चळवळ व्हावी - डॉ. अजय चंदनवाले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

पुणे - ‘‘मानवी अवयव तयार करता येत नाहीत, ते दान केल्यानेच दुसऱ्या गरजू रुग्णाचे प्राण वाचणार आहे. त्यामुळे रुग्णाच्या मेंदूचे कार्य थांबल्यानंतर नातेवाइकांनी अवयवदान करावे,’’ असे आवाहन बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी केले. मेंदूचे कार्य थांबलेल्या रुग्णाचे अवयव वैद्यकीय दृष्ट्या योग्य आणि निरोगी असल्यास ते गरजू रुग्णांना दान करून अवयवाच्या रूपाने तो माणूस या जगात आपल्या सोबत असतो. त्यामुळे अवयवदान ही एक चळवळ व्हावी, असेही ते म्हणाले.

अवयव दानाबाबत जनजागृतीसाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयातर्फे महाअवयवदान जनजागृती अभियान प्रभातफेरी काढण्यात आली होती. त्या वेळी डॉ. चंदनवाले बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत अवयवदानाची शपथ घेण्यात आली. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, अधीक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. समीर जोशी, डॉ. अरुण कोवाळे आणि उपअधीक्षक डॉ. मनजित संत्रे यांच्यासह विद्यार्थी, परिचारिका, वैद्यकीय समाज सेवक यात सहभागी झाले होते.

बापट म्हणाले, ‘‘वैद्यकीय प्रगती वेगाने होत आहे. त्यामुळे अवयवदान हे मानवाला मिळालेले एक वरदान आहे. रक्तदान, नेत्रदान याबरोबरच आता अवयवदानाची चळवळ झाली पाहिजे.’’

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणातून प्रभातफेरी सुरू झाली. बंडगार्डन पोलिस ठाणे, राष्ट्रीय विषाणू संस्था, पोलिस आयुक्त कार्यालय, मुख्य टपाल कार्यालय, साधू वासवानी चौक, मध्यवर्ती शासकीय इमारत मार्गे ही प्रभात फेरी पुन्हा महाविद्यालयाच्या प्रांगणात आली आणि समारोप करण्यात आला.

Web Title: pune news organ donation