अवयवदानासाठी देशात ‘स्पेन मॉडेल’ हवे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मूळचे महाराष्ट्रीय असलेले डॉक्‍टर संजय देशपांडे गेली १७ वर्षे इंग्लंडमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत आहेत; मात्र तरीही ते महाराष्ट्राला विसरलेले नाहीत. दरवर्षी कोकणातील डेरवण येथे ते आणि त्यांचे सहकारी मोफत शस्त्रक्रिया करतात आणि तेही सर्व प्रकारच्या. अवयवदानाच्या चळवळीत ते जेवढ्या हिरिरीने भाग घेतात, तेवढ्याच उत्साहाने आता युरोपीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याची जबाबदारी पेलत आहेत. त्यांच्या पुण्याच्या मुक्कामात त्यांनी ‘सकाळ’शी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा.

मूळचे महाराष्ट्रीय असलेले डॉक्‍टर संजय देशपांडे गेली १७ वर्षे इंग्लंडमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत आहेत; मात्र तरीही ते महाराष्ट्राला विसरलेले नाहीत. दरवर्षी कोकणातील डेरवण येथे ते आणि त्यांचे सहकारी मोफत शस्त्रक्रिया करतात आणि तेही सर्व प्रकारच्या. अवयवदानाच्या चळवळीत ते जेवढ्या हिरिरीने भाग घेतात, तेवढ्याच उत्साहाने आता युरोपीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याची जबाबदारी पेलत आहेत. त्यांच्या पुण्याच्या मुक्कामात त्यांनी ‘सकाळ’शी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा.

प्रश्‍न - तुमचे वैद्यकीय शिक्षण कुठे झाले? 
- मी औरंगाबादला १९७६ मध्ये वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात प्रवेश केला. १९८१ मध्ये एमबीबीएस पदवी घेऊन बाहेर पडलो. त्यानंतर १९८४ मध्ये बधिरीकरण शास्त्रामध्ये एमडी झालो. यानंतर स्वप्ननगरी असलेल्या मुंबईत कामाच्या उद्‌देशाने आलो. येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तीन वर्षे काम केले. त्या वेळी माझ्या स्वप्नांना वाट मिळाली. कारण, या हॉस्पिटलमध्ये बधिरीकरण शास्त्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ होते. हे सर्व तज्ज्ञ इंग्लंडमधून आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केले. 

प्रश्‍न - भारतात समाजकार्य करावेसे का आणि कधी वाटले? 
- मी ज्या वेळी इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेत होतो, त्याचदरम्यान डॉ. सुनील नाडकर्णी यांची एक डीव्हीडी पाहिली. यामध्ये दिगंबरदास महाराज सहस्रबुद्धे यांच्याबाबतची डीव्हीडी पाहणे हीच खरी समाजकार्याची सुरवात झाली म्हणण्यास हरकत नाही. त्यांच्या या डीव्हीडीमुळे २००५ मध्ये भारतात आलो. त्याचदरम्यान मी उराशी बाळगलेले कोकणचे स्वप्न पूर्ण केले. डेरवणचे समाजकार्य जवळून पाहिले. त्यांच्या या समाजकार्याने मी एकदम प्रभावित झालो. त्यानंतर इंग्लंडला परतल्यावर माझ्या सहकाऱ्यांशी त्याबाबत चर्चा केली. त्यांना येथील समाजकार्य कशा स्वरूपाचे आहे, ते पटवून दिले. त्याचबरोबर कोकणातील लोकांचा उत्साह वाढविण्यासाठी तसेच त्यांना काही नवीन कल्पना सुचविण्यासाठी आपण त्यांच्या समाजकार्यात सहभागी व्हावे, अशी इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली. माझ्या या इच्छेचे वास्तवात रूपांतर झाले आणि अखेर या समाजकार्याचा जन्म २००६ मध्ये झाला. 

प्रश्‍न - कोकणवासीयांच्या कोणकोणत्या शस्त्रक्रिया केल्या?
- कोकणवासीय वयस्करांमध्ये मोतीबिंदू हा आजार मोठ्या प्रमाणात असल्याचे कळाले. त्यामुळे येथील लोकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. जवळजवळ प्रत्येक भेटीवेळी शंभरच्यावर मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्याचबरोबर लोकांमध्ये दीडशे ते दोनशे सांधारोपणाच्या शस्त्रक्रियाही यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. चूल वापरत असल्याने भाजण्याचे अनेक रुग्ण कोकणात असतात. त्यामुळे अशा रुग्णांवर प्लॅस्टिक सर्जरीही केल्या आहेत. यामध्ये माझे सहकारी काहीही अपेक्षा न बाळगता गेली १३ वर्षे हे समाजकार्य यशस्वीरीत्या पूर्ण करत आहेत. 

प्रश्‍न - युरोपीय मराठी संमेलनाचे आयोजक तुम्ही आहात, याविषयी काही सांगाल का? 
- हो, खरंच या गोष्टीचा मला खूप आनंद होत आहे. मराठी संस्कृती पुढे नेण्याचे भाग्य मला या संमेलनाच्या माध्यमातून मिळणार आहे. हे संमेलन दर दोन वर्षांनी युरोपच्या एका शहरात आयोजित केले जाते. यंदाचे हे संमेलन बारावे असून, न्यू कॅसल या शहरात भरणार आहे. हे संमेलन २९, ३० जून ते १ जुलैपर्यंत असणार आहे. यामध्ये भारतातील अनेक कलाकारांचा समावेश असणार आहे. आपला इतिहास, संस्कृती, विचारांची देवाणघेवाण व्हावी, त्याचबरोबर मराठी माणसांतील एकोपा वाढविणे हाच या संमेलनामागचा हेतू आहे. 

प्रश्‍न - अवयवदानामधील समाजकार्याविषयी?
- अवयवदान करण्यात जगात स्पेन हा देश प्रथम आहे. स्पेन या देशाची अवयवदानाविषयीची जनजागृती पाहून आपणही इंग्लंडमध्ये याची सुरवात करावी, असे मनापासून वाटले. त्यामुळे या कार्यालाही सुरवात केली. जनजागृतीच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोचविले. त्याचे परिणाम आम्हाला लवकर पाहायला मिळाले. याचप्रकारे हा उपक्रम भारतातही राबविला. मी स्वतः मंदिर, मशीद, शीख मंदिरांत जाऊन जनजागृती केली आहे. तसेच, आताही पुण्यामध्ये अवयवदानाविषयी विविध रुग्णालये, महाविद्यालयांत विविध ठिकाणी यावर व्याख्याने देतो आहे.

Web Title: pune news Organ donation spain model sanjay deshpande