पद्मावत चित्रपटाला विरोध करणाऱ्या 15 जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

पुणे - पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करत वडगाव पुलाजवळ मंगळवारी मध्यरात्री टोळक्‍याने आठ ते दहा वाहनांची तोडफोड करून चाकांतील हवा सोडून दिली. या प्रकरणी पोलिसांनी 15 जणांना अटक केली असून, त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना शनिवार (ता. 27) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

या प्रकरणी महेश लक्ष्मण भापकर (वय 30, रा. गांधीनगर, डोंबिवली पूर्व) यांनी फिर्याद दिली आहे. वडगाव बुद्रुक पुलाजवळ नऱ्हे येथे मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास 20 ते 25 जण आले. त्यांनी पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करत हातात झेंडे घेऊन निदर्शने केली. त्या वेळी ट्रकचालक भापकर हे तेथून जात असताना काठीने ट्रकच्या काचा फोडून चाकांतील हवा सोडून दिली. तसेच आठ ते दहा वाहनांच्या काचा फोडून ते पसार झाले. या घटनेनंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी 15 जणांना दुपारी अटक केली. या टोळक्‍याने दोघांना मारहाण करून त्यांच्या खिशातील रोकड काढून घेतल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांविरुद्ध दरोड्याचाही गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपींकडून रक्‍कम हस्तगत करण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी केली. न्यायालयाने ती मंजूर केली. 

शहरात चोख पोलिस बंदोबस्त 
पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील 36 चित्रपटगृहांमध्ये पद्मावत चित्रपट दाखविला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर कोठे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी 50 पोलिस अधिकारी आणि 250 पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. चित्रपटगृहांच्या मालकांनीही सुरक्षा व्यवस्था ठेवून सीसीटीव्ही लावावेत, अशा त्यांना सूचना दिल्या असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त संजय बावीस्कर यांनी दिली. 

Web Title: pune news padmavat movie karni sena