वेदनामुक्त जीवन रुग्णाचा हक्कच 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

"पॅलिएटिव्ह केअर'ची गरज 
अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल रुग्णाच्या प्रवृत्तीबद्दल नातेवाइकांना काळजी असते. रुग्णाच्या प्रकृतीतील चढ-उताराबद्दल नातेवाइकांना अद्ययावत माहिती हवी असते. रुग्णाला नेमके काय झाले आहे आणि कोणत्या दिशेने उपचार सुरू आहेत, हे डॉक्‍टरांकडून समजून घ्यायचे असते. अशा वेळी प्रशिक्षित पॅलिएटिव्ह केअरच्या तज्ज्ञाची गरज असते. तो रुग्ण, डॉक्‍टर आणि नातेवाईक यांच्याशी संवाद साधू शकतो, असे रुबी हॉल क्‍लिनिकच्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. प्राची साठे यांनी सांगितले. 

पुणे - सर्वच मोठ्या आणि गुंतागुंतीच्या आजारांसाठी वेदनाशामक उपचार सेवा (पॅलिएटिव्ह केअर) ही काळाची गरज आहे. आतापर्यंत फक्त कर्करोगापुरती मर्यादीत असलेल्या सेवेची व्याप्ती आता पक्षाघातापासून ते वार्धक्‍यापर्यंत होत आहे. त्याला कायदेशीर आधार मिळत असून, वेदनामुक्त जीवन जगणे हा प्रत्येक रुग्णाचा हक्क म्हणून आता पुढे येत आहे. 

जागतिक पॅलिएटिव्ह केअर दिन शनिवारी (ता. 14) साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने या क्षेत्रातील तज्ज्ञांनी ही माहिती दिली. आतापर्यंत पॅलिएटिव्ह केअर ही फक्त कर्करोगापुरती मर्यादीत होती. पण आता वैद्यकीय सेवेचा वेगाने विस्तार होत आहे. रुग्णाच्या हक्काबाबत जागृती होत आहे. त्यामुळे या क्षेत्राचा विकास आता काळाची गरज आहे. 

"सिंम्पॅटिको पॅलिएटिव्ह केअर'च्या डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी म्हणाल्या, ""वेदनाशामक उपचार हा वैद्यकीय सेवेचा एक भाग म्हणून पुढे येत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील ही स्पेशालिटी सेवा आहे. रुग्णाच्या वेदना कमी करण्याचा या सेवेचा मुख्य उद्देश आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वेदनामुक्त जगण्यासाठी या प्रकारची सेवा उपयुक्त ठरते. केंद्र सरकारलाही या उपचार पद्धतीचे महत्त्व पटल्याने या बाबत आवश्‍यक ते बदल कायद्यात करण्यात येत आहे.'' 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील "रेडिएशन आँकोलॉजी' विभागातील डॉ. सोनाली पिंगळे म्हणाल्या, ""रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांनी वस्तुस्थितीवर आधारित अपेक्षा ठेवणे आवश्‍यक आहेत. त्याप्रमाणे रुग्णाच्या उपचारांची दिशा निश्‍चित केली पाहिजे. पॅलिएटिव्ह केअर तज्ज्ञांबरोबर काम करताना रुग्णाचे प्राधान्य कशाला आहे, हे जास्त स्पष्टपणे समजते. त्यामुळे उपचारांचे लक्ष्य निश्‍चित करता येते.'' 

कर्करोगतज्ज्ञ डॉ. सचिन हिंगमिरे म्हणाले, ""पॅलिएटिव्ह केअर हे सांघिक काम आहे. कर्करोगतज्ज्ञ रुग्णाला केमोथेरपी देत असतात त्याच वेळी त्यातून होणाऱ्या वेदनांचे व्यवस्थापन करण्याचे काम पॅलिएटिव्ह केअरच्या तज्ज्ञाला करावे लागते.'' 

प्रत्येक गुंतागुंतीच्या उपचार घेणाऱ्या रुग्णाला "पॅलिएटिव्ह केअर' मिळाली पाहिजे. वेदनामुक्त जीवन जगणे हा मूलभूत मानवी अधिकार आहे. रुग्णाचा हा हक्क नाकारणे म्हणजे मानवी हक्काची पायमल्ली आहे. 
-न्या. एस. आर. बन्नूरमथ, अध्यक्ष, राज्य मानवी हक्क आयोग

Web Title: pune news Pain-free life World Palliative Care Day