निविदा प्रक्रियेत रखडली पालखीतळांची कामे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

पालखी प्रस्थान दोन दिवसांवर; कामांना सुरवात नाही

पालखी प्रस्थान दोन दिवसांवर; कामांना सुरवात नाही
पुणे - पंढरपूर आषाढी वारीसाठी येत्या शुक्रवारी आळंदीहून संत ज्ञानेश्‍वर आणि देहूतून संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान होणार आहे; परंतु पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील 21 पालखीतळांवरील सपाटीकरण करून मुरूम टाकण्याच्या कामांसह अन्य विकासकामे निविदा प्रक्रियेमुळे रखडली आहेत.

30 कोटींच्या खालील कामांच्या निविदांची माहिती राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे एका कामासाठी 750 पानांची टिपणी द्यावी लागते. निविदा प्रक्रियेत मंजुरी मिळाली तरी कार्यादेश (वर्कऑर्डर) काढले नसल्याने कामे रखडली आहेत.

दरम्यान, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली 15 मे रोजी पालखीतळांच्या कामांबाबत आढावा बैठक झाली होती. यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील पालखीतळांच्या जागांचे सपाटीकरण, मुरूम टाकणे, खडी टाकणे यासह पिण्याच्या पाण्याची, सांडपाणी व्यवस्था, कायमस्वरूपी शौचालये आणि सीमाभिंत उभारणे अशी कामे करण्यात येणार होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून प्रशासकीय मंजुरीनंतर अद्याप एकाही पालखीतळावर काम सुरू करण्यात आलेले नाही. दरम्यान, मॉन्सूनच्या पावसाने पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात हजेरी लावली असल्याने ऐन पावसात कामे सुरू करण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या निधीतून प्रत्येक पालखीतळासाठी 2 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहे. पालखी सोहळ्यात पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात 36 पालखी मुक्काम आणि आठ रिंगण होतात. त्यापैकी 21 पालखीतळावर मुरमीकरण, खडीकरणासाठी निविदा प्रक्रिया झाली आहे. येत्या दोन दिवसांत पालखी प्रस्थान होत असले तरी पालखीदरम्यान ही कामे केली जातील.
- उत्तम चव्हाण, उपायुक्त, विशेष कार्य अधिकारी, तीर्थक्षेत्र विकास आराखडा

खासगी संस्थांकडून काम?
पालखीतळ विकासकामांमधील पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील सासवड, जेजुरी, वाल्हे, यवत, वरवंड, लोणी काळभोर, बारामती, सणसर, आंथुर्णे, इंदापूर, सराटी, निंबूत आणि निरवांगी गावांचा समावेश आहे; तसेच सोलापूरमधील बोरगाव, माळशिरस, वेळापूर, पिराची कुरोली, भंडीशेगाव, तर सातारा जिल्ह्यातील लोणंद, तरडगाव आणि परब या पालखीतळांच्या मुरमीकरण आणि खडीकरणाचे काम खासगी संस्थांकडून केले जाईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

Web Title: pune news palkhi place work stop in tender process