पाल्यांच्या जडणघडणीचे पालकांसमोर आव्हान

पाल्यांच्या जडणघडणीचे पालकांसमोर आव्हान
पाल्यांच्या जडणघडणीचे पालकांसमोर आव्हान

पालकत्वाच्या संकल्पनेत बदल; मुलांच्या करिअरचाही विचार करणे गरजेचे
पुणे - मोबाईल, लॅपटॉप, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाशी कनेक्‍टेड झालेले आजचे विद्यार्थी. मात्र तंत्रज्ञानाशी अजूनही फारसा समरस न झालेला पालकवर्ग. त्यातही शाळा, महाविद्यालयांकडून पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा. वेळप्रसंगी शाळा, महाविद्यालये आणि पालकांमध्ये होणारा संघर्ष. या परिस्थितीत पाल्याच्या जडणघडणीचे मोठे आव्हान पालकांपुढे आहे. मात्र, पालकत्वाची संकल्पना बदलत असल्याने "डिजिटल जनरेशन' सोबत जुळवून घेताना, पालकांनी स्वतःच्या हक्कांविषयी जागरूक राहणे महत्त्वाचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

पालक आणि पाल्य या दोन पिढ्यांचे हे अंतर गेल्या काही वर्षांपासून थोडेसे दुरावलेले दिसत आहे. मात्र दुरावलेले अंतर, सद्यःस्थितीतील आव्हाने आणि त्यावर उपाय शोधणे, हेदेखील पालकांचे कर्तव्य होय. आजच्या काळातली जीवनशैली बदलत चालली असली, तरीही मात्र या बदलत्या काळात पालकांनी आपल्या मुलांशी संवाद वाढवावयास हवा. हेही तितकेच खरे! मात्र हे करताना पाल्यांचे विचार ऐकून घेणे. त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपणे. त्याचे स्वतंत्र विचार त्यांच्याच भविष्याकरिता उपयुक्त आहेत का, याचीही पडताळणी करणे. मुलांना आपल्या परिसरातील भाषेशी जुळवून घेणे. त्यांच्या विचारशक्तीला प्रोत्साहन देणे. प्रसंगानुरूप त्यांना दिशादर्शक मार्गदर्शन करणे, ही पालकांची जबाबदारी आहे.

शाळा, महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या पालक सभांमध्ये पालक सहभागी झाल्यास शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमधील दुरावा कमी होऊ शकतो. त्यातून पुष्कळसे प्रश्‍न मार्गी लागू शकतात. विशेषतः पौगंडावस्थेतील मुलांकरिता हे आवश्‍यक आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत पालक, पाल्यांमध्ये काही वेळेस वैचारिक अंतर पडल्यासारखे दिसते. मुलांना समजून घेणे, त्यांच्याशी खुला संवाद पालकांनी साधायला हवाय. केवळ आपल्याच करिअरकडे न पाहता, मुलांच्या करिअरचाही विचार प्रामुख्याने पालकांनी, शिक्षकांनी देखील करायला हवा. असे तज्ज्ञ सांगतात.

बहुतांश वेळेला मुले सोशल मीडियामध्ये रमून गेलेली पाहायला मिळतात. त्यामुळे दोन पिढ्यांतील पडलेले अंतर जाणवू लागले आहे. सोशल मीडियामुळे प्रसारित होणाऱ्या निरनिराळ्या माहितीबद्दल पालकांनाही वेळप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधणे अवघड होऊन बसल्याचे वास्तव आहे. परंतु स्पर्धेच्या युगात पालकांकडून विद्यार्थ्यांवर करिअरच्या अपेक्षांचे ओझे लादले जाते. त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक जडणघडणीवर होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून त्यांच्यातील गुणांना पालकांनी प्रोत्साहित करावे.

याबाबत लेखिका डॉ. श्रुती पानसे म्हणाल्या, 'डिजिटल जनरेशनशी संवाद साधायचा असेल, तर पालकांना तंत्रज्ञान शिकावे लागेल. त्यामुळे पाल्य व पालकांमधील दुरावाही कमी होईल. मनमोकळ्या गप्पांतून अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. मात्र शाळा, महाविद्यालयांबाबत पालक किती जागरूक आहेत, याबाबत मात्र मला साशंकता वाटते.''
महापेरेन्ट्‌स संघटनेचे सचिव दिलीपसिंग विश्‍वकर्मा म्हणाले, 'पालकांना सजग करण्याची जबाबदारी सरकारची आहे. कारण पालकांविषयीचे कोणते कायदे आहेत. यापासून बहुतांश पालक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे अनेकदा शाळा, महाविद्यालयांनी घेतलेल्या निर्णयाबाबत पालकांना कायदेशीर माहिती नसते.''

दोन पिढ्यांतील पडलेल्या अंतराची कारणे-
- बदलते तंत्रज्ञान.
- तंत्रज्ञानाचा मानवी संबंधांवर परिणाम.
- विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पालक व पाल्यांना मिळालेले मुक्त स्वातंत्र्य.
- संभाषणातील अभाव.
- भाषाशैलीतला बदल.
- शारीरिक बदलाबाबत मोकळेपणाने संवाद नाही.
- सोशल मीडियाचा वाढता प्रभाव.
- एकटेपणामुळे मुलांची होणारी कुंचबणा.
- करिअरच्या मागे लागलेल्या पालकांचे पाल्यांकडे दुर्लक्ष.

दोन पिढ्यांपुढची आव्हाने-
- पालकांना कौटुंबिक गरजा भागविण्याची चिंता.
- पाल्यांप्रमाणेच पालकांनाही व्हावे लागले सोशल मीडियाशी कनेक्‍टेड.
- पालकांच्या सहवासाकरिता मुलांनीही त्यांच्याशी सुसंवाद वाढविणे.
- कौटुंबिक जिव्हाळा जपणे.
- एकमेकांना सातत्याने समजावून घेणे.
- एकमेकांच्या सवयी, आवडी-निवडी जाणून घेणे.
- एकमेकांच्या गरजाही ओळखणे.

दोन पिढ्यांना एकत्रित आणण्यासाठीचे उपाय-
- कुटुंबात एकत्रितपणे चर्चा करणे
- कुटुंबीयासमवेत रमणे.
- पालकांनी पाल्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे.
- विविध कार्यक्रमांत पाल्यांना सहभागी करून घेणे.
- पाल्यांना घरच्या कामांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे.
- वेळप्रसंगी पाल्यांच्या आवडीप्रमाणे चर्चा करणे.
- मुलांनी देखील पालकांच्या तब्येतीची काळजी घेणे.
- आई-वडिलांच्या आवडीनिवडी जोपासणे.
- आई-वडिलांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com