‘पार्किंग’मध्ये अतिक्रमणे अन्‌ रस्त्यावर ‘पे अँड पार्क’!

मंगेश कोळपकर
शुक्रवार, 23 मार्च 2018

पुणे - शहरातील अनेक व्यावसायिक स्वरूपाच्या इमारतींमध्ये पार्किंगच्या जागेत अतिक्रमणे झाल्यामुळे तेथील वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याचे चित्र आहे. विकास नियंत्रण नियमावलीत (डिसी रूल) प्रत्येक सदनिकेसाठी किंवा दुकानांसाठी पार्किंग किती हवे, याचे स्पष्ट नियम आहेत. परंतु, त्यांचे उल्लंघन होत असल्यामुळे वाहने रस्त्यांवर उभी करण्याचे प्रमाण वाढत आहे. 

पुणे - शहरातील अनेक व्यावसायिक स्वरूपाच्या इमारतींमध्ये पार्किंगच्या जागेत अतिक्रमणे झाल्यामुळे तेथील वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याचे चित्र आहे. विकास नियंत्रण नियमावलीत (डिसी रूल) प्रत्येक सदनिकेसाठी किंवा दुकानांसाठी पार्किंग किती हवे, याचे स्पष्ट नियम आहेत. परंतु, त्यांचे उल्लंघन होत असल्यामुळे वाहने रस्त्यांवर उभी करण्याचे प्रमाण वाढत आहे. 

मोकळ्या जागांवर अतिक्रमणे
शहरातील प्रमुख ५४ रस्त्यांवर पार्किंग पॉलिसीअंतर्गत ‘पे अँड पार्क’ योजना राबविली जाणार आहे. मात्र, इमारती, हॉटेलच्या आवारातील पार्किंगच्या जागेवर झालेली अतिक्रमणे महापालिका दूर केव्हा करणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या अतिक्रमणांमुळे नागरिकांना त्यांची वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. त्यामुळे इमारतीमध्ये अतिक्रमणे आणि रस्त्यावर वाहने उभी केली तर ‘पे अँड पार्क’चा भुर्दंड, असा पेच नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. तसेच अनेक इमारतींमध्ये ‘व्हिजिटर्स पार्किंग नॉट अलॉउड’ असे फलक लागलेले आहेत. जंगली महाराज, फर्ग्युसन रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता, विमाननगर, सिंहगड रस्ता आदी ठिकाणी इमारतींच्या आवारातील मोकळ्या जागांवर अतिक्रमणे करून हॉटेल आणि इतर व्यवसाय थाटल्याचे चित्र शहरात दिसत आहे. महापालिकेकडून या बाबत सातत्याने कारवाई झाल्यास रस्त्यांवरील पार्किंगचा प्रश्‍न सुटू शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

...तर गुन्हा दाखल होणार 
याबाबत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल तेली-उगले म्हणाल्या, ‘‘कोणत्याही इमारतीमध्ये पार्किंगसाठीची जागा त्याच उद्देशासाठी वापरणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, त्या जागेत व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येते. जंगली महाराज, फर्ग्युसन रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता आदी ठिकाणी महापालिका वारंवार कारवाई करीत आहे. काही ठिकाणी दुकानदारांचे अतिक्रमण आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या पुढच्या काळात पार्किंगच्या जागेचा गैरवापर करणाऱ्यांवर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात येईल. 

हॉटेलसाठी परवानगी देताना डिसी रूल नुसार पार्किंगसाठी जागा उपलब्ध असेल तरच तो अर्ज मंजूर केला जातो. परंतु, पोलिस परवाना मिळाल्यावर त्या जागेत अतिक्रमण झाल्यास महापालिकेने कारवाई करायची आहे. नियमांचे उल्लंघन झाले तर महापालिका संबंधितांवर गुन्हा दाखल करू शकते. त्या-त्या इमारतींमधील वाहने तेथे पार्क झाली तर, रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्‍न बहुतांश प्रमाणात सुटू शकतो.
- अशोक मोराळे, वाहतूक पोलिस उपायुक्त 

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील इमारतींमध्ये फ्रंट मार्जिनमध्ये वाहने उभी करण्यासाठी जागा असते. त्यावर अतिक्रमण करून त्या जागेचा व्यावसायिक वापर होताना दिसतो. महापालिका सातत्याने कारवाई करीत नाही. तसेच एफएसआयची खैरात करताना त्या प्रमाणात सुविधा वाढविलेल्या नाहीत. त्यामुळे पार्किंगच्या जागेची समस्या निर्माण होत आहे. त्यासाठी डीसी रूलमधील पार्किंगच्या निकषांमध्येही वाढ होणे गरजेचे आहे.
- हेमंत साठ्ये, वास्तुविशारद  

सातारा रस्त्यावरील डीमार्टमध्ये पार्किंगच्या जागेत माल ठेवण्यात येत असल्याचे अनेकदा निदर्शनास येते. त्याठिकाणी पार्किंगसाठी पुरेशी जागाच नसल्याने ग्राहक रस्त्यावरच पार्किंग करतात त्यामुळे त्याचा परिसरातील रहिवाशांना त्रास होतो शिवाय वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात होत आहेत.
- नीलेश बारगुजे, नागरिक 

Web Title: pune news parking encroachment pay and park