पार्किंगचे पैसे ठेकेदारांच्या घशात!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

महापालिकेची वाहनतळे ठेकेदारांना भाडेतत्त्वावर दिली आहेत. त्यानुसार त्यांनी मुदतीत भाडे भरणे आवश्‍यक आहे. मात्र, काहीजण ते भरत नाहीत. त्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. पुढील काही दिवसांत ती वसूल केली जाईल. सध्या जानेवारीअखेरपर्यंतची ९६ लाख रुपयांची थकबाकी आहे.
- सतीश कुलकर्णी, मालमत्ता व व्यवस्थापन विभागप्रमुख, महापालिका

पुणे - राजकीय हस्तक्षेपाने आधीच कमी पैशात घेतलेल्या वाहनतळांचे भाडे थकवून त्यातही सवलत घेण्याची धडपड महापालिकेने नेमलेले ठेकेदार करीत आहेत. अशा ठेकेदारांकडे महापालिकेचे सुमारे एक कोटी रुपये थकले असून, थकबाकी वसुलीच्या नोटिसा बजावूनही ठेकेदार प्रशासनाला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनतळांमधून मिळणारे काही उत्पन्न बुडवण्याची भीती निर्माण झाली आहे.

राजकीय हस्तक्षेपाने ‘लाभ’ 
शहरातील वाहनचालकांच्या सोयीसाठी महापालिकेने विविध भागांत ‘पे ॲण्ड पार्क’ योजनेंतर्गत वाहनतळे उभारली आहेत. त्यात, इमारती आणि मोकळ्या जागांवरील वाहनतळांचा समावेश असून, त्यांची संख्या २२ आहे. ही वाहनतळे ठेकेदारांना ठराविक मुदतीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असली तरी, बहुतांशी ठेकेदारांनी राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपाने कामे मिळविली आहेत. 

सवलतीसाठी प्रयत्न!
महापालिकेच्या अटी-शर्ती मान्य करून वाहनतळे ताब्यात घेतल्यानंतर ठेकेदारांनी अटींकडे पाठ फिरविली आहे. काही वाहनतळांसाठी तीन महिन्यांचे भाडे आगाऊ भरणे बंधनकारक आहे. पण, ते दर महिन्याचे भाडेही भरत नसल्याचे आढळून आले आहे. अशा ठेकेदारांना कामे बंद करण्याचा इशारा देत महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने नोटिसा दिल्या आहेत. मात्र, एकाही ठेकेदाराने समाधनाकारक खुलासा दिलेला नाही. उलटपक्षी भाडे थकवून त्यात सवलत घेण्यासाठी काही ठेकेदार प्रयत्न करीत असून, २२ पैकी दहा ठेकेदारांकडे सुमारे एक कोटी रुपयांचे भाडे थकले आहे.

‘पे ॲण्ड पार्क’ - 22
थकबाकी - 1 कोटी

Web Title: pune news parking money contractor