रुग्णसेवा व्यावसायिक; मिळकतकर मात्र निवासी!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

महापालिका प्रशासनाकडून शहर व उपनगरांतील हॉस्पिटलच्या परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये मिळकतकर आकारणीसह अन्य मुद्यांवर महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करू.
- डॉ. प्रकाश मराठे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे

पुणे - रुग्णसेवेचे लाखो रुपयांचे उत्पन्न असताना हॉस्पिटलचा मिळकतकर मात्र निवासी म्हणून भरून काही डॉक्‍टरांकडून कोट्यवधी रुपयांचा कर बुडविला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेने अशा डॉक्‍टरांवर दंडासह मिळकतकर वसुलीचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे.  

राज्य सरकारच्या आदेशानुसार ३१ मार्चपूर्वी महापालिकेच्या हद्दीतील हॉस्पिटल, प्रसूतिगृहे आणि दवाखान्यांचे परवाने सर्व निकष तपासून नूतनीकरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामध्ये अनेक नियमबाह्य गोष्टी उघडकीस येत आहेत. गेली अनेक वर्षे निवासी वर्गवारीप्रमाणे मिळकतकर भरणाऱ्यांना बिगरनिवासीप्रमाणे मिळकतकर भरण्यास सांगितले आहे.

महापालिकेचे कोट्यवधींचे आर्थिक उत्पन्न बुडाल्यामुळे संबंधितांकडून दंडासह मिळकतकर वसूल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून परवाने नूतनीकरण करीत असताना काही हॉस्पिटल, प्रसूतिगृहे आणि दवाखान्यांमध्ये पाणी, वीज यांची जोडणी बिगरनिवासी प्रकारातील आहे.

तसेच, इमारतीमध्ये ‘वापरातील बदल’ महापालिका प्रशासनाला कळविले नाही. त्यामुळे मिळकतकर आकारणीमध्ये त्रुटी राहिल्या. छाननीमध्ये या गोष्टी पुढे आल्यानंतर मिळकतकर आकारणीसह सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतरच परवाने नूतनीकरण केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. 

धाबे दणाणले
 काही हॉस्पिटल, प्रसूतिगृहे आणि दवाखान्यांना निवासी वर्गवारीनुसार मिळकतकर आकारला जात असल्याचे 
निदर्शनास आले. 
 महापालिकेकडून संबंधितांना बिगरनिवासीनुसार मिळकतकर भरण्याचे आदेश दिले आहेत.
 संतप्त रुग्णालयचालक आणि डॉक्‍टरांनी ‘यापूर्वी निवासी वर्गवारीनुसार मिळकतकर का घेत होते. महापालिका प्रशासनाकडून या संदर्भात का कळविले नाही,’ असे प्रश्‍न उपस्थित केले. 
 महापालिकेकडून मिळकतकर भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च दिल्यामुळे संबंधित रुग्णालयचालकांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: pune news patient service business income tax