पेव्हिंग ब्लॉक बदलण्याचा ‘उद्योग’ तेजीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

व्यावसायिकांशी संधान साधून कोट्यवधी रुपयांची उधळण

व्यावसायिकांशी संधान साधून कोट्यवधी रुपयांची उधळण

पुणे - रस्त्यालगतचे पदपथ चकाचक आणि सुंदर करण्याच्या नावाखालीही नगरसेवक मंडळी आणि महापालिकेतील अधिकारी कोट्यवधी रुपये वाया घालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पदपथावरील ‘पेव्हिंग ब्लॉक’ बदलण्याची गरज नसतानाही एक-दोन वर्षांनी ‘ब्लॉक’ बदलण्याचा ‘उद्योग’ सर्रास केला जात आहे. ‘ब्लॉक’ची निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांशी संधान साधून, पदपथासाठी वर्षाला कोट्यवधी रुपये उधळले जात आहेत. मार्केट परिसरातील एक किलोमीटर लांबीच्या पथपदाकरिता तब्बल एक कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा पदपथ व्यावसायिकांनी गिळंकृत केला आहे.  

नवी पेठ पर्वती (प्रभाग क्रमांक २९) मधील दोन पदपथ वर्षभरात उखडण्यात आल्याचे महापालिकेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. महापालिकेचा पथ विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांकडून स्वतंत्रपणे कामे केली जात असल्याने एकाच कामासाठी दोनदा निधी खर्च होत असल्याचेही सांगण्यात आले. एकाच कामासाठी दोन यंत्रणा काम करीत असतानाही त्यांच्यात समन्वय नसल्याचेही दिसून आले. 

पादचाऱ्यांच्या सोयीसाठी शहरात १२ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यालगत पदपथ आवश्‍यक आहेत. त्यानुसार शहर आणि उपनगरांमध्ये सध्या सुमारे १ हजार २०० किलोमीटर लांबीचे पदपथ आहेत. त्यासाठी विविध स्वरूपाचे सिमेंटचे ब्लॉक वापरण्यात येतात. या ब्लॉकचे आयुष्य दहा ते बारा वर्षांचे असतानाही दर एक-दोन वर्षांनी ते बदलण्याचे धोरण नगरसेवक आणि अधिकारी आखत असल्याचे स्पष्ट आहे. या ब्लॉकची निर्मिती करणारे व्यावसायिक दर वर्षाला नव्या रचनेचे (डिझाइन) ब्लॉक बाजारात आणतात.

केवळ या व्यावसायिकांच्या मालाला उठाव देण्याच्या उद्देशाने ब्लॉक बसविण्याचे नियोजन प्रभागांमध्ये केले जाते. त्यासाठी लाखो रुपयांची तरतूदही करून घेण्यात येते. विशेष म्हणजे, वर्गीकरणाद्वारेही पदपथासाठी लाखो रुपये घेण्यात येतात. त्यामुळे मूळ अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या योजना रखडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

दर्जाबाबत उदासीनता
एखाद्या भागातील पदपथावरील पेव्हिंग ब्लॉक बदलताना संपूर्ण पदपथाच्या खर्चाइतका निधी मंजूर करून घेतला जात असल्याच्या तक्रारी आहेत. एक ते दीड किलोमीटर लांबीच्या पदपथासाठी दीड कोटी रुपयांपर्यंतचा निधी देण्यात येतो. त्यामुळे कर रूपाने जमा होणाऱ्या पुणेकरांचे पैसे अशा प्रकारे उधळले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र पदपथ आणि त्यावरील ब्लॉकसाठी नेमका किती खर्च झाला, त्याचा दर्जा काय आहे, याची तपासणी करण्याचे धाडस क्षेत्रीय अधिकारी दाखवत नाहीत.

शहरात पदपथाची कामे मुख्य विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून केली जातात. त्या त्या भागातील रस्त्यांची रुंदी, त्यावरील वाहनांची वाहतूक आणि पादचाऱ्यांची वर्दळ लक्षात घेऊन पदपथ बांधण्यात येतात. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी पदपथांची कामे होतात. आवश्‍यकतेनुसार त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते.’’
- राजेंद्र राऊत, महापालिका पथ विभागप्रमुख

Web Title: pune news paving block changes business increase