मिळकतकर आणि पाणीपट्टीसाठी आता मोबाईल बॅंकिंग 

दीपेश सुराणा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारेही बिल स्वीकारणार
"महानगरपालिकेचा मिळकतकर आणि पाणीपट्टीचे बिल मोबाईल बॅंकींगद्वारे नागरिकांना भरता यावे, तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही बिल भरण्याची सुविधा मिळावी, यासाठी आवश्‍यक नियोजन सुरू आहे. त्यासाठी बॅंकांकडून प्रस्ताव मागविले होते. संबंधित प्रस्ताव जमा करण्याची शुक्रवार अखेर मुदत होती. चांगला व्याजदर देणाऱ्या बॅंकांचे प्रस्ताव स्वीकारण्याचे विचाराधीन आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागेल.'' 
- राजेश लांडे, मुख्य लेखापाल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका. 

पिंपरी : महापालिकेचा मिळकतकर आणि पाणीपट्टी हे सध्या ऑनलाइन तसेच करसंकलन कार्यालयात जाऊन भरण्याची व्यवस्था कार्यान्वित आहे. ही सुविधा आता नागरिकांना थेट मोबाईल बॅंकीगद्वारे उपलब्ध व्हावी, या दृष्टीने महापालिकेचे नियोजन सुरू आहे. त्याशिवाय, घरोघरी जाऊन क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे बिल स्वीकारण्याची सुविधा दिली जाणार आहे. 

महापालिकेचा मिळकतकर आणि पाणीपट्टी भरण्याची सुविधा सध्या 6 क्षेत्रीय कार्यालये आणि 16 करसंकलन कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. नव्याने झालेल्या आणखी दोन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. त्याशिवाय, महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन मिळकतकर आणि पाणीपट्टी भरण्याची सुविधा सुरू आहे. नागरिकांना पाणीपट्टीचे आणि मिळकतकराचे बिल वाटप करणाऱ्या प्रतिनिधींकडेच क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे बिल भरण्याची सुविधा महापालिकेतर्फे दिली जाणार होती. त्याशिवाय, संबंधित प्रतिनिधीकडेच नागरिकांनी बिलाच्या रकमेपोटी धनादेश द्यावे, यासाठी आवश्‍यक सुविधाही देण्याचे नियोजित होते. मात्र, त्याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. पाणीपट्टीच्या बिलापाठीमागे मात्र अशी सुविधा असल्याचे नमूद केले जात आहे. त्यामुळे नागरिक मात्र बुचकळ्यात पडत आहेत. 

  • शहरातील एकूण मिळकती : 4 लाख 50 हजार 761 
  • मिळकत कराचे वार्षिक उत्पन्न (2016-17) : 393 कोटी 35 लाख 
  • शहरातील एकूण नळजोड : 1 लाख 45 हजार 530 
  • पाणीपट्टीचे वार्षिक उत्पन्न (2016-17) : 31 कोटी 16 लाख 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news PCMC to accept property tax through mobile banking