अनधिकृत जाहिरात फलकांवर पिंपरी कॅम्पात कारवाई

रविंद्र जगधने
मंगळवार, 4 जुलै 2017

अशा फलकांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या वाढल्याने प्रशासनाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात मंगळवारी अचानक ही कारवाई केली.

पिंपरी : पिंपरी कॅम्पात विविध मोबाईल कंपन्या व व्यावसायिकांनी अनधिकृतपणे लावलेल्या जाहिरात फलकांवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने मंगळवारी (ता. 4) सायंकाळी धडक कारवाई केली. 

शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पातील साई चौक, शगुन चौक, आर्यसमाज चौक, कराची चौक आदी भागात विविध मोबाईल व इलेक्‍ट्रॉनिक कंपन्यांनी महापालिकेची जाहिरात लावण्याची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात फलक व मोठमोठे होर्डिंग लावले होते. त्यात बाजारात नवीनच आलेल्या मोठ्या परदेशी मोबाईल कंपन्यांचा समावेश आहे. या मोबाईल कंपन्या संबंधित दुकानमालकाला लाखो रुपये भाडे देऊन विद्युत रोषणाईचे जाहिरात फलक लावत असत. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत होता. तर परिसरात बकालपणा वाढला होता. अशा प्रकारचे बेकायदा जाहिरात फलक बाजारपेठेत अनेक वर्षापासून लावले जात असून त्याकडे महापालिका प्रशासन डोळेझाक करत होते. मात्र अशा फलकांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या वाढल्याने प्रशासनाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात मंगळवारी अचानक ही कारवाई केली.

मंगळवारी बाजारपेठ बंद असल्याने कारवाई करण्यास अडचणी आल्या नाहीत. एकूण 96 अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आलेल्याचे आकाशचिन्ह विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान कारवाईच्या काळात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, तर या संधीचा फायदा घेत अनेकांनी भंगार लंपास केले. काही काळ वाहतूककोंडीही झाली होती. याबाबत सहाय्यक आयुक्त योगेश कडुसकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

राजकीय पुढाऱ्यांच्या दुकानांवर कारवाई नाही बाजारपेठेत भाजप उपशहराध्यक्ष व राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचे मोबाईलची दुकाने आहेत. मात्र या दुकानांना हातही न लावता शेजारच्या मोबाईल दुकानांचे फलक तोडण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर साई चौकातील एका मोबाईल दुकानदाराचे महापालिका व पोलिस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याने त्याच्या दुकानावरील फलकावर कारवाई झाली नसल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. 

कारवाई दरम्यान तोडपाणी 
काही व्यावसायिक कारवाई टाळण्यासाठी आकाशचिन्ह विभागाच्या काही अधिकाऱ्यांशी तोडपाणीची भाषा करत असल्याचे निदर्शनास आले. पिंपरीत एकाही जाहिरात फलकांची परवानगी नसताना फक्त मोजक्‍याच दुकानदारांवर कारवाई का? कायदा जर सर्वांसाठी समान आहे, तर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या दुकानावर का कारवाई केली नाही. 
- रहीम खान, स्थानिक नागरिक. 

Web Title: pune news PCMC action against illegal hoardings