पीएमपीमध्ये ५४९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

पुणे - पीएमपीमधील सुमारे ४१९ वाहक-चालकांच्या बदल्या पीएमपी प्रशासनाने विविध आगारांत केल्या आहेत. नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने त्यांना हजर होण्यास सांगण्यात आले आहे. तसेच १३० मदतनिसांच्याही बदल्या झाल्या आहेत. 

पुणे - पीएमपीमधील सुमारे ४१९ वाहक-चालकांच्या बदल्या पीएमपी प्रशासनाने विविध आगारांत केल्या आहेत. नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने त्यांना हजर होण्यास सांगण्यात आले आहे. तसेच १३० मदतनिसांच्याही बदल्या झाल्या आहेत. 

पीएमपीमध्ये मार्गांच्या सुसूत्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच आस्थापना आराखड्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. त्याला अनुसरून या बदल्या केल्या असल्याचे प्रशासनाने सांगितले. पीएमपीच्या स्वारगेट, पुणे स्टेशन, कोथरूड, नरवीर तानाजीवाडी, हडपसर, पिंपरी, भोसरी, निगडी, मार्केट यार्ड, शेवाळवाडी आदी १३ आगारांत २१२ चालक आणि २०७ वाहकांच्या बदल्या झाल्या आहेत. तसेच हेल्पर, क्‍लीनर या पदावर काम करणाऱ्या १३० कर्मचाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत. विविध आगारांत त्यांच्या बदल्या करताना त्यांच्या पदाचे नाव आता मदतनीस करण्यात आले आहे. या सर्व बदल्या प्रशासकीय कारणास्तव केल्या असल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, प्रशासनाने एकावेळी सुमारे ५४९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यामुळे कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. 

पीएमटी कामगार संघटनेचे (इंटक) उपाध्यक्ष अशोक जगताप म्हणाले, ‘‘पीएमपी प्रशासनाने इंटकबरोबर १९९७ मध्ये करार केला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या घराजवळील आगारात नियुक्ती देण्यात येईल, असे म्हटले होते. या अटीचे प्रशासनाने उल्लंघन केले आहे. बदल्या करण्यास संघटनेचा विरोध नाही. परंतु कर्मचाऱ्यांना घराजवळ नियुक्ती दिल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत आणखी वाढ होईल.’’ प्रशासनाने केलेल्या बदल्यांत हडपसरजवळ राहणाऱ्या कर्मचाऱ्याला कोथरूडमध्ये, तर कात्रजमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्याला भोसरीमध्ये नियुक्ती मिळाली आहे. अशा पद्धतीने केलेल्या बदल्या कर्मचाऱ्यांसाठी गैरसोयीच्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: pune news pemp 549 employee transfer