पुणेः महामार्गावर पेट्रोल-डिझेलची चोरी करणारी टोळी जेरबंद

जनार्दन दांडगे
मंगळवार, 11 जुलै 2017

लोणी काळभोर (पुणे): महामार्गावर रात्रीच्या वेळी थांबलेल्या जड वाहनांच्या चालकांना मारहाण करुन, त्यांच्या वाहनाच्या टाकीतील पेट्रोल-डिझेलची चोरी करणाऱ्या आठ जणांच्या अट्टल टोळीस जेरबंद करण्यात जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक अन्वेषण शाखेस यश आले आहे.

लोणी काळभोर (पुणे): महामार्गावर रात्रीच्या वेळी थांबलेल्या जड वाहनांच्या चालकांना मारहाण करुन, त्यांच्या वाहनाच्या टाकीतील पेट्रोल-डिझेलची चोरी करणाऱ्या आठ जणांच्या अट्टल टोळीस जेरबंद करण्यात जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक अन्वेषण शाखेस यश आले आहे.

स्थानिक अन्वेषण शाखेचे प्रमुख, पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या टोळीचा म्होरक्या विजय उर्फ गुड्डू रामनारेश सिंग (वय 38 रा. पापदेवस्ती, फुरसुंगी ता. हवेली) याच्यासह आठ जणांना वाडेबोल्हाई परीसरातून सोमवारी (ता. 11) मध्यरात्रीच्या सुमारास चोरीच्या दोन हजार डिझेलसह ताब्यात घेतले. या टोळीने गेल्या पाच वर्षांच्या काळात पुणे, मुबंई, नगरसह संपुर्ण राज्यात अनेकांना लुटल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी विजय उर्फ गुड्डू सिंग याच्यासह गणेश भाऊसाहेब मुरकुटे (वय. 37 रा. शिरसवाडी, ता हवेली), सुभाष दगडू मालपोते (वय 35, मोरया पार्क, वाडेबोल्हाई ता. हवेली), सिकंदर मुरली बेन बन्सी (वय 27), सुशील ऊर्फ फक्कड राजमान बेन बन्सी (वय 25, रा. वाडेबोल्हाई ता. हवेली, मुळगाव- मानापूर वाराणसी उत्तर प्रदेश), विकास श्रीपरमात्मा दुबे (वय 25, रा. वाडेबोल्हाई ता. हवेली, मूळगाव बौडयार, जि. बस्ती उत्तर प्रदेश), किरण विश्वनाथ बेज (वय 19, रा सानपाडा, गावदेवी मुंबई) व आकाश अशोक हिरवे (वय 23, रा. वाडेबोल्हाई ता. हवेली) या आठ जनांना अटक केली आहे.

पोलिसांनी वरील आरोपींकडून चोरलेले 1800 लिटर डिझेल, 150 लिटर पेट्रोलसह चोरीच्या कामासाठी वापरण्यात येणारी एक इंडिका कार, एक तवेरा जीप, एक मोटारसायकल असा चार लाख रुपये किमतीचा माल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हडपसर-सासवड मार्गावर वडकी गावचे हद्दीत रात्रीच्यावेळी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका वाहणाच्या डिझेलच्या टाकीतुन, चार ते पाच जणांनी वाहनचालकास मारहाण करत डिझेलची चोरी केली होती. यापुर्वीही जिल्ह्यात अन्य मार्गावरही अशाच पध्दतीने वाहनचालकांना मारहाण करुन, लुटल्याच्या घटना घडल्याने या प्रकरणाचा सखोल चौकशी करुन, आरोपींना अटक करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक सुवेज हक यांनी स्थानिक अन्वेषण शाखेला केल्या होत्या.

या सुचनेच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला असतानाच, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाडेबोल्हाई परीसरातील एका खाजगी हॉटेलच्या पाठीमागे आठ जण संशयितरित्या हालचाली करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक निशीकांत जगताप यांनी आपले सहकारी दत्तात्रेय गिरीमकर, महेश गायकवाड, निलेश कदम, मोरेश्वर इनामदार आदींनी लोणीकंद पोलिस ठाण्याचे प्रमुख पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यासह वरील ठिकाणी छापा टाकला. यावेळी आठही जण मुद्देमालासह आढळून आले. वरील सर्व आरोपींना लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. वरील आठही जण अट्टल गुन्हेगार असुन, त्यांच्या आणखी तीन साथीदारांची नावे पोलिसांना समजली आहे. विशेषबाब म्हणजे विजय उर्फ गुड्डू सिंग व त्याच्या या धंद्यातील काही सहकाऱ्यांना यापुर्वीच लोणी काळभोर पोलिसांनी अटकही केली होती.

याबाबत अधिक माहिती देतांना अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले म्हणाले, विजय उर्फ गुड्डू सिंग व त्याचे कांही सहकाऱ्यांनी पुणे, मुबई, नगर सह अनेक जिल्ह्यात रस्त्यावर थांबलेल्या जड वाहनांच्या टाकीतून डिझेलची चोऱ्या केलेल्या आहेत. लोणी काळभोर हद्दीत अशाच प्रकारचा गुन्हा घडल्यापासून पोलिस वरील टोळीचा शोध घेत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठ्या शिताफीने वरील टोळीला ताब्यात घेतले आहे. वरील टोळीतील अनेक सदस्य परप्रांतीय असल्याने, पोलिसांना टोळीच्या कारवाईंची सखोल चौकशी सुरु केली आहे. प्राथमिक चौकशीत वरील टोळीने लोणी काळभोर हद्दीतील दोन गुन्ह्यांसह अऩेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला, 7 ठार
या हल्ल्याचा तीव्रपणे निषेध करावा : नरेंद्र मोदी
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन​

तळेगाव 'MIDC'तील चौथ्या टप्प्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध
मुकेश अंबानींच्या "ऍण्टिलिया'ला आग​

Web Title: pune news Petrol and diesel stolen gang arrested in the loni kalbhor highway