रंगला आनंद सोहळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

पुणे - नानाविध फुलांनी सजवलेली माउलींची पालखी... भजनात दंग झालेले वारकरी... मृदंगावर पडणारी थाप... लाखो लोक एकत्र येऊनही वारीत असलेली शिस्त... प्रत्येकाच्या मनात असलेली विठ्ठलभक्तीची आस... त्यासाठी ऊन-वारा-पाऊस झेलण्याची त्यांची तयारी... जात-धर्म बाजूला ठेवून सर्वांना एका प्रवाहात आणणारा हा आनंद सोहळा छायाचित्रांच्या माध्यमातून पाहताना वारीत प्रत्यक्ष सहभागी झाल्याचा प्रत्यय प्रत्येक रसिकाला येत होता.

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी ॲण्ड सिनेमॅटोग्राफी यांच्या वतीने आणि ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ यांच्या सहकार्याने आयोजित ‘इंद्रायणी ते चंद्रभागा- चित्रप्रवास’ या छायाचित्र स्पर्धेत भाग घेतलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन ‘एबीआयएल कॉर्पोरेशन’च्या व्यवस्थापकीय संचालक स्वप्नाली कदम यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘सकाळ’चे संपादक मल्हार अरणकल्ले, ‘भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी’चे राजन चौगुले, फाउंडेशनचे व्यवस्थापक उद्धव भडसाळकर उपस्थित होते.

कदम म्हणाल्या, ‘‘वारीत वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. बघायला मिळतात. त्यामुळे मी १२ वर्षांपासून वारीत सहभागी होत आहे. आपल्याला नवी ऊर्जा देणारा हा सोहळा आहे. तो पुन्हा छायाचित्रांच्या माध्यमातून अनुभवताना प्रत्यक्ष वारीच डोळ्यांसमोर येत आहे.’’ अरणकल्ले म्हणाले, ‘‘कोणतेही निमंत्रण किंवा कार्यक्रम पत्रिका नसताना लाखो लोक एकत्र येतात. वारीत भक्ती, श्रद्धा, त्याग, समर्पण अशी वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. ती पाहताना 

संपन्न, समृद्ध संस्कृतीचेच दर्शन होते. इतके उत्कट दर्शन अन्यत्र पाहायला मिळत नाही.’’

बालगंधर्व कलादालन येथे बुधवार (ता. १९) पर्यंत सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळात हा आनंदसोहळा अनुभवता येणार आहे.

ओमकार दामले यांचा प्रथम क्रमांक 
‘इंद्रायणी ते चंद्रभागा’ या छायाचित्र स्पर्धेत राज्यातील छायाचित्रकारांकडून एक हजार ९५ छायाचित्रे आली होती. यातून ओमकार दामले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अथर्व सरनोत यांनी द्वितीय, तर दर्शन दोशी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थमध्ये किशोर पाटील (प्रथम), प्रणव देव (द्वितीय) व स्वप्नील मोरे (तृतीय) यांना पारितोषिके देण्यात आली. 

Web Title: pune news photography