...अन्‌ चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ उलगडला 

...अन्‌ चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ उलगडला 

पुणे  - बाबूराव पेंटर यांच्या "सती सावित्री' (1927) पौराणिक मूकपटातील पतीच्या प्राणासाठी यमापुढे हात जोडणारी सावित्री.. त्यानंतर व्ही. शांताराम यांचा भारतातील पहिला रंगीत चित्रपट "सैरन्ध्री'.. त्याहीपुढच्या काळातील "डॉ. मधुरिका', "मुक्ती', "अछूत कन्या' अशा मूकपट, बोलपट, रंगीत जुन्या चित्रपटांच्या दुर्मीळ पोस्टर प्रदर्शनाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ उलगडण्यात आला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे (एनएफएआय) हे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन भरविण्यात आले असून, त्यामध्ये पोस्टरबरोबरच जुन्या चित्रपटांवरील कॅलेंडर, डायऱ्या, मग अशा वस्तू व पुस्तकांचा खजिनाही ठेवण्यात आला आहे. 

कोथरूड येथील सिटी प्राइड मल्टिप्लेक्‍सच्या परिसरातील "राज कपूर पॅव्हेलियन'मध्ये भरलेल्या "पिफ फोरम'चे उद्‌घाटन अभिनेते रणधीर कपूर, ऋषी कपूर व राजीव कपूर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर तिन्ही कपूर बंधूंनी विविध शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलना भेट देत "एनएफएआय'चे पोस्टर प्रदर्शनही पाहिले. या वेळी दिग्दर्शक रमेश सिप्पी, महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, "एनएफएआय'चे संचालक प्रकाश मगदूम उपस्थित होते. 

जुन्या मराठी व हिंदी चित्रपटांच्या पन्नासहून अधिक दुर्मीळ पोस्टरचा खजिना या प्रदर्शनामध्ये खुला करण्यात आला आहे. त्यामध्ये सैरन्ध्री (1933), वहिनीच्या बांगड्या (1953), डॉ. मधुरिका (1935), मुक्ती (1937), मीराबाई, बालयोगिनी, जोगन, स्टंट क्वीन, झांसी की राणी, मुघल-ए-आझम, उंबरठा, सती, अश्‍विनी अशा अनेक चित्रपटांचे पोस्टर या प्रदर्शनात ठेवले आहेत. याबरोबरच प्रदर्शनामध्ये चित्रपटाशी संबंधित विविध प्रकारच्या वस्तू, पुस्तके, मग आणि कॅलेंडरही ठेवले आहेत. 

विविध संस्थांचा सहभाग 
"पिफ फोरम'मध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट प्रशिक्षण संस्थांनी सहभाग घेतला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापन विभाग, प्रसाद कॉर्प, एमआयटी स्कूल ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन, डी. वाय. पाटील विद्यापीठ या भारतीय संस्थांसह "इन्स्टिट्युटो इटालियानो कल्चरा' ही परदेशी संस्थाही सहभागी झाली आहे. याबरोबरच राज्य सरकारच्या सामाजिक वनीकरण व वन विभागानेही स्टॉलद्वारे आपल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com