‘पिफा’तर्फे गुरुवारी गुंतवणूकदार जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

पुणे - पुणे इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स असोसिएशनतर्फे (पिफा) गुंतवणूकदार जागर मोहिमेतील या वर्षीचा पहिला कार्यक्रम आठ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दुपारी साडेचार वाजता आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा ‘सकाळ’ माध्यम सहयोगी असून, कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. 

पुणे - पुणे इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स असोसिएशनतर्फे (पिफा) गुंतवणूकदार जागर मोहिमेतील या वर्षीचा पहिला कार्यक्रम आठ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दुपारी साडेचार वाजता आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा ‘सकाळ’ माध्यम सहयोगी असून, कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. 

दरवर्षीच आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, विचारवंत यांना आमंत्रित करून हा कार्यक्रम गुंतवणूकदारांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात येतो.
‘पिफा’ ही स्वायत्त आर्थिक सल्लागार संस्था गेली सहा वर्षे पुणे परिसरात कार्यरत आहे. गुंतवणूक क्षेत्रात स्वतंत्र आर्थिक सल्लागारांचे महत्त्व अधोरेखित करणे व त्यांना सर्वंकष सेवा देता यावी म्हणून वर्षभर निरनिराळे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, गुंतवणूकदारासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा, म्युच्युअल फंडाचे विविध बारकावे स्पष्ट करणारे परिसंवाद, तज्ज्ञांची भाषणे आयोजित करणे, ही ‘पिफा’ची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या मालिकेत ‘स्मार्ट मनी’ सेमिनार नावाची कार्यशाळा ‘पिफा’ दरवर्षी आयोजित करते व तिला पुणेकर नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

गेली तीन वर्षे शेअर बाजाराने चांगला परतावा दिला आहे. बांधकाम क्षेत्रातील मंदी, कमी झालेले बॅंकांचे व्याजदर व सोन्याची कमी झालेली झळाळी यामुळे गुंतवणुकीचा बराच मोठा ओघ म्युच्युअल फंडाकडे वळला आहे. अशा वेळी या मार्गावरील खाचाखोचा सांगत, संपत्तीकडून समृद्धीकडे जाणारा योग्य मार्ग गुंतवणूकदारापर्यंत पोचवण्याची गरज आहे. संसदेत नुकत्याच मांडल्या गेलेल्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार घसरला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशा अवस्थेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन गरजेचे ठरणारे आहे.

या कार्यक्रमाची सुरवात महिंद्रा म्युच्युअल फंडाचे राष्ट्रीय विक्री व विपणनप्रमुख जतिंदरपाल सिंग करणार आहेत. या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि भारतीय आर्थिक क्षेत्राच्या इतिहासाची खास जाण हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. नंतर, अल्पावधीत गुंतवणूकदारप्रिय झालेल्या मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आशिष सोमय्या आपले विचार मांडतील. म्युच्युअल फंडाविषयी सखोल चिंतन, भविष्यवेधी प्रगतीशील विचार मांडणे यात त्यांचा हातखंडा आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे उपाध्यक्ष क्रिशन शर्मा कार्यक्रमाच्या शेवटी बोलतील. कठीण आर्थिक विषयाची सोपी व सुटसुटीत मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. पुणेकर रसिकांनी या तिन्ही वक्‍त्यांच्या विचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘पिफा’तर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्‍यक आहे. त्यासाठी दूरध्वनी क्र. ७७१९०४१४०७ किंवा ‘पिफा’चे संकेतस्थळ www.pifaa.org यावर संपर्क करता येईल.

Web Title: pune news piffa investor publicity