आधार नोंदणी अभियानाचा उडाला बोजवारा

रविंद्र जगधने
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

महापालिकेकडे 31 आधार नोंदणी मशिन दिल्या असून, त्या मशिन व महा-ईसेवा दिलेले ऑपरेटर कायम स्वरूपी महापालिकेकडे ठेवले जाणार आहे. नागरिकांना त्रास होणार नाही, याबाबत आम्ही उपाययोजना करत असतो.
- मोनिका सिंग, उपजिल्हाधिकारी

पिंपरी : सरकारी तसेच काही खासगी कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. त्यामुळे आधार कार्ड तयार करण्याची प्रत्येकाची धडपड असते, मात्र सरकारी यंत्रणांकडून नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पिंपरी चिंचवड पालिकेच्या सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांत गुरुवार (ता. 7) व रविवार (ता. 10) या दोन दिवशी आधार कार्ड विशेष नोंदणी अभियान आयोजित केले होते. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या अभियानाचा सपशेल बोजवारा उडाला.

अभियानाची माहिती अनेक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरून शहरभर भिरवल्या. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने नागरिक सकाळपासून
आठही क्षेत्रीय कार्यालयात आले. मात्र, प्रशासनातर्फे कोणत्याच योग्य उपाययोजना न केल्याने लहान मुलांसह, ज्येष्ठ व गरोदर महिलांना अन्नपाण्याशिवाय ताटकळत थांबावे लागले. आधार नोंदणी तर झाली नाहीच, मात्र मनस्ताप व शारीरिक त्रास तेवढा मिळाला. जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांना आधार नोंदणीसाठी चार मशिन देण्यात आल्या होत्या; परंतु त्यातील एकाच मशिनवर आधार नोंदणी होत होती, तर बाकी तीन मशिनवर दुरुस्ती होत असल्याचे चित्र थेरगावमधील 'ग' क्षेत्रीय कार्यालयात पाहावयास मिळाले. याबाबत उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांना विचारले असता त्यांनी याला दुजोरा दिला. मुळात नवीन आधार नोंदणीसाठी मोठी संख्या असताना नोंदणीसाठी फक्त एकच मशिन ठेवल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. दुरुस्तीची मोजकी संख्या संपल्यानंतर ऑपरेटर बसून होते. दुरुस्तीच्या फीबाबत कोणतेच फलक लावले नव्हते.

प्रशासनातच संभ्रमावस्था
थेरगाव येथील 'ग' क्षेत्रीय कार्यालयात सकाळी सहापासून नागरिक आधार कार्डसाठी रांगेत उभे होते. अधिकारी येऊन पाहणीही करून गेले. मात्र, प्रत्यक्षात कामाची सुरवात दुपारी बारा वाजता झाली. प्रथम नागरिकांना दिलेले अर्ज भरल्यानंतर काही वेळाने ते अर्ज जुने असल्याचे सांगून नवीन अर्ज पुन्हा भरायला दिले. त्यामुळे नवीन अर्ज भरल्यानंतर पुन्हा नवीन रांग तयार झाली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला, अशी माहिती कीर्ती खंदारे यांनी दिली.

गरोदर महिलेचे हाल
एका गरोदर महिलेला पालिकेच्या दवाखान्यात प्रसूतीसाठी पतीचे नाव असलेले आधार कार्ड मागितले. ती गुरुवारी ग क्षेत्रीय कार्यालयात दुरुस्तीसाठी आली असता, लग्नपत्रिका पुरावा ग्राह्य धरला जाईल, असे तिला सांगितले. मात्र रविवारी तीनचार तास थांबल्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र लागेल असे सांगून तिला बाहेर काढण्यात आले. तिची प्रसूतीची तारीख या महिन्याची 20 तारीख असल्याने तिची धावपळ सुरू होती. मात्र, तिलाही हतबल होऊन परतावे लागले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
थँक यू, मिस डॉ. मेधा  खोले !
श्रीगोंद्यात शाळांमधील दीडशे खोल्या धोकादायक
अक्कलकोट: बोरी नदीत बुडालेल्या तरुणाचा मिळाला मृतदेह
भोंदूबाबांच्या विरोधात आखाडा परिषदेचा 'शड्डू'
पुण्यात वाढतेय बेसुमार ‘दृश्‍य प्रदूषण’!
पंचसूत्रीच्या जोरावर यशस्‍वी व्हा!
सजतेय, नटतेय नवी मुंबई
बागवान गल्ली ते सौदी.. रोटचा खुसखुशीत प्रवास 

Web Title: pune news pimpri aadhar card registration system failure