युवकांच्या हाती स्वच्छतेचा झेंडा

वैशाली भुते
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

सर्वांना या मोहिमेचा मागोवा घेता यावा, यासाठी त्यांनी "इन्स्टाग्राम' आणि "फेसबुकवर' travel instead या नावाने पेज सुरू केले आहे. तर, "यूट्यूब'वर चॅनेलही सुरू केले असून, त्याद्वारे ते महिन्याचा वृत्तांत प्रसिद्ध करणार आहेत.

रोहन, शरयू, राखी यांची स्वच्छता मोहिमेसाठी भारतभ्रमंती

पिंपरी (पुणे) : आजच्या तरुण पिढीच्या सवयी... त्यांची जीवनशैली... मानसिकता आणि सामाजिक उदासीनतेबाबत हमखास नकारात्मक बोलले जाते. पण, स्वच्छ भारताचा संदेश देण्यासाठी संपूर्ण देशभरात भ्रमंती करण्याचा निर्णय येथील तीन तरुण-तरुणींनी घेतला आहे. सामाजिक उत्तरदायित्वाप्रती झपाटलेली ही तरुण मंडळी सलग वर्षभर भारतभ्रमंती करून "स्वच्छ भारत मोहीम' सक्रियपणे राबविणार आहेत.

अवघ्या पंचवीस-तिशीत असलेल्या रोहन सरडेकर, शरयू घोडेकर आणि राखी कुलकर्णी यांनी स्वच्छ भारताचा झेंडा हाती घेतला आहे. कुटुंबीय, आप्तेष्ट, व्यवसाय, पैसा सर्व मागे ठेवून ते येत्या पाच नोव्हेंबरला मोहिमेवर निघणार आहेत. त्यासाठी त्यांनी जय्यत तयारी केली असून, पुढील वर्षभरात काश्‍मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रवास करणार आहेत. प्रवासादरम्यान ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम, स्वच्छतेबाबतच्या कार्यशाळा, जनजागृती कार्यक्रम घेणार आहेत. शास्त्रीय गायनाची आवड असलेली शरयू गीतांची, तर रोहन आपल्या छायाचित्राची जोड देणार आहेत.
देशातील 29 राज्यांसह पाच केंद्रशासित प्रदेश व प्रत्येक राज्यातील तीन ते चार शहरे असे एकूण दोनशेहून अधिक शहरे ते फिरणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवेचा आधार घेणार आहेत. तसेच काही दुर्गम भागांना भेटी देऊन तेथील लोकजीवन समजून घेणार आहेत. मोहिमेसाठी त्यांना प्रत्येकी तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

रोहन म्हणाला, ""गिर्यारोहण मोहिमांमध्ये आमची ओळख झाली. शिवाय समाजाविषयी असलेल्या तळमळीतून आमचे तिघांचे सूर जुळले. आपल्या भटकंतीच्या छंदाचा सामाजिक कार्याची जोड देण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यादृष्टीने तीन वर्षांपासून तयारी सुरू केली. सुरवातीला कुटुंबाकडून कडाडून विरोध झाला. मात्र, आमचे झपाटलेपण लक्षात घेऊन प्रोत्साहन दिले.''

""सरकार एकटे काहीही करू शकत नाही. त्यासाठी सर्वप्रथम समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. याची सुरवात प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने स्वत:पासून करावे, असे आमचे मत आहे. त्यातून आम्ही हा परिवर्तनाचा वसा घेतला,'' असे शरयू म्हणाली.

वर्षभर सातत्यपूर्ण भ्रमंती करण्यासाठी या तिघांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार केले आहे. नियमित चालणे, योगासने, पोषक आहारातून मिळविलेली ऊर्जा यासाठी पुरेशी असल्याचे त्यांचे मत आहे.

असा असेल प्रवास
5 नोव्हेंबर सुरवात - कर्नाटकमधील हंपी. त्यानंतर केरळ, तमिळनाडू असे दक्षिणेकडील राज्य असा 35 ते 40 हजार किलोमीटरचा प्रवास करून गोव्यामध्ये समारोप.

Web Title: pune news pimpri swachh bharat abhiyan and youth