धावपट्टीला 'ब्रेक'

धावपट्टीला 'ब्रेक'

पुणे - हवाई दलाच्या लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम एकीकडे ‘टेकऑफ’ करीत असताना, दुसरीकडे विमानाच्या धावपट्टीची लांबी (रनवे लेंथ) वाढविण्याच्या कामाला अद्याप ‘क्‍लिअरन्स’ मिळालेला नाही. हे काम गेल्या एक तपाहून अधिक काळ प्रलंबित आहे. त्यामुळे मोठ्या क्षमतेच्या विमानांची सेवा सुरू करणे शक्‍य नसल्याने आर्थिक विकासाला खीळ बसत आहे. वाढती प्रवासी संख्या आणि कार्गो सुविधा यामुळे विमानतळाला एसटी स्टॅंडचे स्वरूप आले आहे.

प्रवासी संख्येच्या आधारावर पुणे विमानतळाचा देशात सातवा क्रमांक लागतो. गेल्या तीन वर्षांत विमानतळावरील प्रवाशांची संख्या तब्बल तीस लाखांनी वाढली आहे. येत्या काही काळात ही संख्या एक कोटीच्या घरात जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी सुमारे पाचशे ते सहाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या विस्तारीकरणाच्या कामात विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंगची क्षमता वाढवणे, ‘पार्किंग बे’ आणि ‘एरो ब्रिज’ आदी कामांचा समावेश आहे. मात्र त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या, धावपट्टीची लांबी वाढविण्याच्या कामाचा समावेश नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

वाढती प्रवासी संख्या आणि हवाई मालवाहतुकीची क्षमता पाहता देशातील शहरांना विमानाद्वारे जोडणारी सेवा आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे याचा विचार करून २००४ मध्ये या विमानतळावरील रनवेची लांबी वाढविण्याचा निर्णय एअरपोर्ट ॲथॉरिटीने घेतला होता. यासाठी आवश्‍यक जागेपैकी थोडी खासगी मालकीची तर काही हवाई दलाच्या ताब्यात आहे. खासगी जागेवरून न्यायालयीन वाद निर्माण झाला होता. मात्र न्यायालयाचा निकालही सरकारच्या बाजूने लागला. तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी तातडीने ही जागा ताब्यात घेऊन हवाई दलाच्या ताब्यातदेखील दिली होती.

त्यालाही काही वर्षे होऊन गेली. मात्र अद्याप रनवेची लांबी वाढविण्याच्या कामाला सुरवात होऊ शकलेली नाही. या संदर्भात एअरपोर्ट ॲथॉरिटी आणि जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी हा प्रश्‍न हवाई दलाच्या अखत्यारित येत असल्याचे सांगितले. तर हवाई दलाचे अधिकारीही यावर बोलण्यास तयार नाही. त्यामुळे या कामाचे काय झाले हे अद्याप गुलदस्तातच आहे.

लांब पल्ल्याच्या सेवा शक्‍य
धावपट्टीची लांबी वाढत नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करता येत नाही. सध्या लोहगाव विमानतळावरून केवळ दुबई, अबुधाबी आणि जर्मनीतील फ्रॅंकफर्ट एवढी मर्यादित सेवा देता येत आहे. धावपट्टीचे काम झाल्यास युरोप, अमेरिका, लंडन यांसारख्या लांब पल्ल्याच्या विमानसेवादेखील पुण्यातून सुरू होऊ शकतात. या सेवांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील मोठी आहे. सध्या त्यांना ब्रेक पद्धतीने सेवा घ्यावी लागते. त्यामुळे या प्रवाशांचा वेळ आणि पैशाचाही अपव्यय होतो. धावपट्टीची लांबी वाढल्यानंतर तो कमी होणार आहे.सध्या लोहगाव विमानतळावर कार्गो सेवा सुरू आहे. मात्र ती मर्यादित आहे. धावपट्टीची लांबी वाढविल्यास कार्गो सेवेचाही विस्तार होऊ शकतो. मुंबई विमानतळावरील कार्गोमधून जो एकूण मालाची निर्यात होते. त्यामध्ये पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील तीस ते चाळीस टक्के वाटा आहे. ती सर्व निर्यात लोहगाव विमानतळावरून होऊ शकते.

सध्याची धावपट्टीची लांबी - ८ हजार ३५० फूट
धावपट्टीची गरज - ९ ते १० हजार फूट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com