‘प्लॅस्टिक द्या, नाणी घ्या...’ने घडवला बदल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

पुणे - प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि वस्तूंनी दिवसेंदिवस घरांत आणि शहरात मोकळा श्‍वास घेणे कठीण होत चालले आहे. अशा काळात याच प्लॅस्टिकचा पर्यावरणपूरक उपयोग होऊ शकेल, या हेतूने जनजागृतीचा एक अभिनव उपक्रम सुरू होतो काय... आणि त्याला पुणेकर भरभरून प्रतिसाद देतात काय... प्लॅस्टिकच्या त्रासापासून मुक्तीसाठी आणि त्याच्या पुनर्वापरात आपलाही सहभाग नोंदविण्यासाठी मंगळवारी बाप्पांच्या दर्शनाला आलेले असंख्य पुणेकर सहभागी झाले आणि त्यांनी आपली एकजूट दाखवून दिली. ‘प्लॅस्टिक द्या, नाणी घ्या...’ या उपक्रमाने हा बदल घडवला...!

‘प्लॅस्टिकच्या भस्मासुरापासून मुक्ती मिळविण्यासाठी त्याचा वापर कमी करणे आणि निसर्गात न फेकता पुनर्वापर करणे या दोन उपायांची गरज आहे,’ ही बाब नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी सकाळ, महापालिका आणि ‘ग्रीनी द ग्रेट’ यांनी गणेशोत्सवात ‘प्लॅस्टिक द्या, नाणी घ्या...’ हा एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील काही निवडक मंडळांच्या मांडवात मंगळवारी त्याची सुरवात झाली. या उपक्रमाला उदंड प्रतिसाद देत अनेक पुणेकरांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवत टाकाऊ प्लॅस्टिक देऊन टाकले. हा प्रतिसाद एवढा होता की, काही मंडळांजवळील मंडपात तर तासाभरातच तीन ते चार किलो टाकाऊ प्लॅस्टिक जमा झाले.

‘प्लॅस्टिक द्या, नाणी घ्या...’ असे आवाहन करणारे छोटेखानी मंडप कसबा गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, हत्ती गणपती मंडळ आणि हिराबाग मंडळ यांच्या मांडवाजवळ उभारण्यात आले आहेत. ते भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. लोकांनी फेकून दिलेल्या प्लॅस्टिकपासून सुबक अशी बहुरंगी नाणी तयार करण्यात आली आहेत. गणेशोत्सवाची आरास पाहायला आलेल्या नागरिकांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या; तसेच इतर वस्तू दिल्यानंतर त्यांना त्या बदल्यात नाणी स्मृतिचिन्ह म्हणून भेट देण्यात आली. या नाण्यांवर एका बाजूला ‘प्लॅस्टिक इज वेल्थ’ आणि दुसरीकडे ‘स्वच्छ भारत’ असे लिहिलेले आहे.

अनेक उत्साही नागरिकांनी आपापल्या प्लॅस्टिकच्या वस्तू देऊन या उपक्रमाला भरभरून पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले. अनेक नागरिक या उपक्रमाची उत्सुकतेने चौकशीही करताना पाहायला मिळाले. सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेअकरापर्यंत हा उपक्रम उत्तम प्रतिसादासह सुरू होता. कचऱ्याचे वर्गीकरण करा, पुनर्वापर करा आणि स्वच्छता राखा, हा संदेशही यातून देण्यात आला.

‘सकाळ’, महापालिका आणि ग्रीनी द ग्रेट यांच्या वतीने राबविण्यात येत असलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. त्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती होईल. ओला-सुका कचरा गोळा करण्याची आणि प्लॅस्टिक वेगळे करण्याची सवय नागरिकांनी स्वतःहून अंगीकारली पाहिजे. पर्यायाने शहराचे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास नागरिकांकडूनच मदत होईल.
- किशोर भोंडवे, नागरिक

प्लॅस्टिकचे विघटन होण्यास वेळ लागतो. या उपक्रमातून स्वच्छतेला चालना मिळणार आहे. किंबहुना स्वच्छतेचा प्रसार व प्रचार होत आहे. पुनर्वापराचा नागरिकांनाच फायदा होऊ शकतो आणि निसर्गाची स्वच्छताही ठेवली जाऊ शकते.
- प्रसाद तेलावडे, नागरिक

नाणी द्या, प्रसाद घ्या
प्लॅस्टिक दिल्यानंतर प्रत्येकाला दोन नाणी भेट मिळतील. त्यापैकी एक नाणे मंडळाला दिल्यास बाप्पाचा प्रसाद आणि नारळही मिळेल. 

Web Title: pune news plastic