प्लॅस्टिक बंदीमुळे हॉटेल व्यावसायिकांची हतबलता; ३० टक्के व्यवसाय ‘पार्सल’वर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

स्टीलच्या डब्यांची देवाण-घेवाण ग्राहकांबरोबर करण्याचा आम्ही विचार करत आहोत. परंतु त्यामध्ये काही समस्या आहेत. डब्याचा दर्जा, किंमत आणि अन्य बाबींचा विचार करता ग्राहकांची मानसिकता यादृष्टीने कितपत सकारात्मक असेल याबाबत शंका आहे. प्लॅस्टिकचा पुनर्वापर करणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे पुनर्वापराबाबत सरकारने विचार करून काही पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत.
- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे हॉटेलियर्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन 

पुणे - आज घरी स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय.. हॉटेलमधून पार्सल घेऊन जाऊया का, असे जर तुमच्या बायकोने विचारले, तर सर्वप्रथम तुमच्याकडे स्टीलचे डबे आहेत का हे तपासा. होय, कारण प्लॅस्टिक बंदीमुळे आता तुम्हाला हॉटेलमध्ये प्लॅस्टिकची पिशवी किंवा डब्यात काहीही दिले जाणार नाही. शहरात चालणाऱ्या हॉटेल्समध्ये तब्बल ३० टक्के व्यवसाय हा ‘पार्सल’वर अवलंबून आहे. होम डिलिव्हरीची सुविधा सर्वांना सोयीची वाटते, पण त्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि डब्यांचा वापर अधिक असल्यामुळे आता त्यावरही मर्यादा येण्याची शक्‍यता आहे. 

प्लॅस्टिकबंदी योग्य असली, तरी त्याला पर्यायी व्यवस्था निर्माण केली तरच हे धोरण यशस्वी होईल. उपलब्ध पर्याय खर्चिक आहेत आणि त्यामध्ये उणिवा आहेत, अशी प्रतिक्रिया हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली. 

‘काका हलवाई’चे युवराज गाडवे म्हणाले, ‘‘प्लॅस्टिक बंदी योग्य आहे. परंतु त्याला पर्याय सरकारने उपलब्ध करून दिला पाहिजे. ही बंदी तेव्हाच यशस्वी म्हणता येईल जेव्हा प्लॅस्टिकला पर्याय असेल.’’

हॉटेल व्यावसायिक रोहित शेट्टी म्हणाले, ‘‘सध्या जेवढा प्लॅस्टिक कंटेनर आणि पिशव्यांचा साठा आहे तेवढा आम्ही वापरून निकाली काढत आहोत. ज्या प्लॅस्टिकचे पुनर्वापर होईल अशा प्लॅस्टिकवर बंदी आणू नये. सध्या आम्ही सिल्व्हर पॅक वापरत आहोत, पण त्याचाही साठा संपत आला आहे. कागदी पिशव्या, बटर पेपर अशा वस्तू वापरण्यावर देखील मर्यादा आहेत. त्यासाठी उपाययोजना केली पाहिजे.’’

हॉटेल व्यावसायिक गणेश हेगडे म्हणाले, ‘‘सिल्व्हर फॉइलच्या पिशव्यांचा वापर करण्याबाबत आम्ही विचार करत आहोत. परंतु त्याचा खर्चाचा भार ग्राहकावर पडेल. त्यामुळे व्यवसायावरही परिणाम होईल. सध्या कंटेनर तसेच कापडी, कागदी पिशव्यांचा देखील वापर करत आहोत. पुढील आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांच्या बैठकीत या विषयावर चर्चा होईल.’’

 द्रव पदार्थांच्या घेऊन जाण्यावर मर्यादा
 प्लॅस्टिक वगळता इतर पर्याय खर्चिक 
 पर्यायी उपाय कुचकामी, त्यामुळे ही बंदी अयशस्वी होण्याची शक्‍यता 
 पुनर्वापर होईल अशा प्लॅस्टिकवर बंदी आणू नये

 

Web Title: pune news plastic ban hotel business parcel