शहरात 70 टक्के नाल्यांची साफसफाई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

पुणे - शहरातून वाहणारे ओढे, नाल्यांमधील कचरा आणि गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहे. या अंतर्गत लोकवस्तीतील नाल्यांची प्राधान्याने दुरुस्ती करण्यात येत आहेत. नाले वळविल्याने पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडू नये, यासाठी उपाययोजना केल्या आहेत, असे महापालिका प्रशासनाने सोमवारी सांगितले. दरम्यान, शहरात आतापर्यंत 70 टक्‍क्‍यांहून अधिक ओढे व नाल्यांची साफसफाई केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. 

शहर आणि उपनगरांमध्ये सुमारे साडेतीनशे किलोमीटर लांबीची ओढे, नाले आहे. त्यात नैसर्गिक नाल्यांची संख्या मोठी आहे. मात्र, पावसाळा तोंडावर येऊनदेखील त्यांची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरण्याच्या घटना घडण्याची शक्‍यता आहे. त्यात चार दिवसांपूर्वी झालेल्या मॉन्सून पूर्व पावसामुळे अनेक भागातील नाल्यांमध्ये पाणी तुंबल्याचे दिसून आले आहे. ओढे, नाल्यांची दुरुस्तीची बाब फारशी गांभीर्याने घेतली नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्‍वभूमीवर विविध भागातील नाल्यांची पाहणी करून त्यांची दुरुस्ती करण्याची सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी संबंधित खात्याला दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून या कामांना वेग आला असून, आवश्‍यक ती कामे तातडीने पूर्ण करण्याचे प्रयत्न प्रशासनाने सुरू केले आहे. 

नगर रस्त्यावरील नाल्यांची दुरुस्ती 
दरवर्षी पावसाळ्यात विशेषत: नगर रस्ता परिसरातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रहिवाशांचे मोठे नुकसान होते. या भागात बांधकामे करीत असताना नाले वळविल्याने अशा घटना घडत असल्याचे पाहणीत आढळून आले. त्यामुळे या भागातील सर्व नाल्यांमधील गाळ काढण्यात आला आहे. पाण्याचा निचरा वेगाने व्हावा, यासाठी आवश्‍यक ती दुरुस्तीही केली असल्याचे महापालिकेचे उपायुक्त विजय दहिभाते यांनी सांगितले. नगर रस्ता परिसरातील नाल्यांची 80 टक्के कामे झाली असल्याचेही ते म्हणाले. 

Web Title: pune news pmc