2800 कोटींचा निधी असूनही 200 कोटींचे कर्ज कशासाठी? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

पुणे - शहरातील 343 बॅंकांत महापालिकेच्या सुमारे 1 हजार 450 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत; तसेच 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी अर्थसंकल्पात 304 कोटी रुपयांची तरतूद आहे, असे असतानाही महापालिकेने 200 कोटी रुपयांचे कर्ज का घेतले, या प्रश्‍नावर प्रशासनाला शुक्रवारी समाधानकारक खुलासा करता आला नाही. 

सर्वसाधारण सभेत प्रश्‍नोत्तरांच्या तासात नगरसेवक आबा बागूल यांनी महापालिकेच्या ठेवी, अनामत रक्‍कम आणि गंगाजळीतील रकमेचे तपशील विचारले होते. यावर मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांनी महापालिकेच्या 1 हजार 450 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, अनामत रकमेचे 952 कोटी रुपये उपलब्ध असून, गंगाजळीत 54 कोटी रुपयांचा निधी असल्याची कबुली दिली; तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी 304 कोटी रुपयांची तरतूद असल्याचेही सांगितले. त्यावर बागूल यांनी महापालिकेकडे एवढा निधी असताना 200 कोटी रुपयांचे कर्ज का घेण्यात आले, अशी विचारणा केली. कर्जरोखे उभारण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली होती का, असेही विचारले. 

कर्जरोखे उभारण्याचा धोरणात्मक निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने घेतला होता, असे कळसकर यांनी सांगितले. दरम्यान, एका बैठकीसाठी आयुक्त कुणाल कुमार निघून गेले होते. त्यामुळे या प्रश्‍नावरील चर्चा पुढील कार्यपत्रिकेवर कायम ठेवावी, अशी मागणी बागूल यांनी केली. महापौर मुक्ता टिळक यांनी ही मागणी मान्य केली; तसेच उपस्थित झालेल्या प्रश्‍नांच्या उत्तरांचे तपशील पुढील सर्वसाधारण सभेत देण्याचा आदेश प्रशासनाला दिला.

Web Title: pune news pmc