जाहिरात फलकांसाठी आता अधिक शुल्क 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

उत्पन्नात मोठी भर? 
महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्येही जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठीची ठिकाणे निश्‍चित करण्यात येत आहेत. दरम्यान, या धोरणामुळे यंदा 40 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार असून, त्यात, आणखी वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

पुणे - महापालिकेचे उत्पन्न घटल्याने जाहिरात फलक, दुकाने, हॉटेल आणि अन्य स्वरूपाच्या फलकांसाठी नवीन शुल्क धोरण अमलात येणार आहे. त्यात शहर, उपनगरे आणि नव्या गावांमधील जाहिरात फलकांचे ठिकाण आणि स्वरूपानुसार शुल्क आकारण्यात येईल. हॉटेल, दुकाने आणि अन्य व्यावसायिक ठिकाणी एकापेक्षा अधिक नाम फलक लावल्यास फलकांनुसार शुल्क वसूल केला जाणार आहे. या नव्या धोरणाची अंमलबजावणी केल्यास महापालिकेला पुढील वर्षभरात सुमारे दोनशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. 

शहरात उभारण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांसाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची परवानगी आवश्‍यक आहे. त्यासाठी फलकाच्या आकारानुसार संबंधितांकडून शुल्क घेतले जाते. सध्या सर्वच भागातील फलकांसाठी एकाच दराने शुल्कआकारणी होत आहे. मात्र, ज्या भागात फलकांना अधिक मागणी आहे, तेथील दर वाढविण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात त्यावर कार्यवाही झालीच नव्हती. 

परिसरनिहाय वर्गवारी 
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी आता फलकांच्या शुल्क आकारणीसाठी संपूर्ण शहराची पाहणी करून परिसरनिहाय वर्गवारी केली आहे. यात फलकांची दोन गटांत वर्गवारी केली आहे. त्यानुसार "अ' गटात सहाशे तर "ब' गटात 1 हजार 149 फलकांचा समावेश आहे. नव्या धोरणानुसार अ गटातील फलकांसाठीचे दर पाचशे रुपये चौरस फूट आणि ब गटाकरिता चारशे रुपये असेल. शिवाय, व्यवसायाच्या ठिकाणी एकापेक्षा अधिक फलक लावल्यास त्या प्रमाणात शुल्क भरावा लागणार आहे. 

डक्‍टमधून सेवावाहिन्या 
समान पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्याबरोबर फायबर ऑप्टिकल केबल टाकण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या डक्‍टमधून सेवा वाहिन्या टाकण्याला परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. 

Web Title: pune news PMC Advertising hoarding More charges