कामकाजाची नियमावली भाजपकडून पायदळी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

पुणे - महापालिकेच्या कामकाजात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष मनमानी करीत असून, परिणामी कामकाज नियमावली पायदळी तुडविली जात आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राजकीय हेतूने करण्यात येत असल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी शुक्रवारी केला. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी घेतलेल्या कर्जरोख्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडून भाजपने सभा तहकूब केली. त्याला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केल्याने सभागृहात गोंधळ उडाला. 

नियोजित चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे उभारण्याचा निर्णय चांगला असल्याचा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी मांडला. तसेच, त्यातील दोनशे कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले असून, केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत कर्जरोख्यांच्या नोंदणीचा कार्यक्रम गुरुवारी झाला. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होताच, देशात कर्जरोखे पहिल्यांदा पुणे महापालिकेने उभारले आहेत, त्यामुळे शहरविकासाच्या प्रक्रियेला चालना मिळणार असल्याचा मुद्दा मांडत सत्ताधारी भाजपने अभिनंदनाचा ठराव मांडला. कर्जरोख्यांना विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांनी या ठरावावर आक्षेप घेतला. त्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप- प्रत्यारोप झाले. त्यानंतर बहुमताच्या जोरावर भाजपने ठराव मंजूर केला. 

""महापालिकेची सर्वसाधारण सभा ही कामकाज नियमावलीनुसार चालते, त्यामुळे एखाद्या ठरावाला विरोध झाल्यानंतर मतदानापूर्वी विरोधकांना भाषणे करण्याचा अधिकार आहे. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले आणि कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी सभा तहकुबीवर बोलायचे आहे, अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली. मात्र, सभा तहकुबीवर बोलण्याच्या अगोदर महापौरांनी मतदान घेण्याची सूचना केली. त्यामुळे विरोधक संतप्त झाले. दरम्यान, सर्वसाधारण सभेचे कामकाज नियमावलीनुसार झाले पाहिजे. मात्र, नगरसचिव आता त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला. महापौरांच्या आदेशानुसारच कामकाज करीत असल्याचे नगरसचिव सुनील पारखी यांनी सांगितले. 

बहुमताच्या जोरावर कारभार 
सभागृहात भाजप बहुमताच्या जोरावर कारभार हाकण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामुळे सभागृहाचे संकेत, नियमावली पायदळी तुडवली जात आहे. महापौर मुक्ता टिळक राजकीय हेतूने काम करतात. विरोधकांना जुमानत नाहीत. त्यामुळे नागरिकांची बाजू कशी मांडायची? विरोधकांनी दिलेल्या सभा तहकुबीचा प्रस्ताव वाचण्याचे सौजन्यही दाखवले जात नाही, असे विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे, राष्ट्रवादीचे विशाल तांबे यांनी सांगितले. 

Web Title: pune news pmc bjp