नाव समितीचे अध्यक्षही सुसाट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

पुणे - महापालिकेच्या शहर सुधारणा, विधी, महिला व बालकल्याण, क्रीडा समितीसह आता जैवविविधता आणि नाव समितीच्या अध्यक्षांना चालकासह महापालिकेची मोटार देण्याचा ठराव सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने बहुमताच्या जोरावर शुक्रवारी मंजूर केला. 

पुणे - महापालिकेच्या शहर सुधारणा, विधी, महिला व बालकल्याण, क्रीडा समितीसह आता जैवविविधता आणि नाव समितीच्या अध्यक्षांना चालकासह महापालिकेची मोटार देण्याचा ठराव सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने बहुमताच्या जोरावर शुक्रवारी मंजूर केला. 

महापालिकेकडून चार विषय समित्यांच्या अध्यक्षांना पूर्वीपासूनच मोटारी दिल्या जातात. आता त्यात जैवविविधता आणि नाव समितीच्या अध्यक्षांची भर पडली आहे. पूर्वीच्याच चार समित्यांना मोटारी द्याव्यात, अशी उपसूचना सुभाष जगताप, प्रकाश कदम यांनी मांडली होती; परंतु सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध केला. परंतु, प्रभारी महापौर सुनील कांबळे यांनी आदेश दिल्यावर झालेल्या मतदानात 42 विरुद्ध 13 मतांनी हा ठराव मंजूर झाला. 

स्मार्ट सिटीला भाडेतत्त्वाने जागा 
महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीला सेनापती बापट रस्त्यावरील "आयसीसी' टॉवरमध्ये महापालिकेची जागा भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव सभागृहात मंजूर झाला. 2008च्या मिळकतवाटप नियमावलीनुसारच निविदा मागवून जागा देण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली होती. मात्र, महापालिकेच्या नियमांचा आढावा घेऊनच जागा भाडेतत्त्वावर देण्यात येईल, असे भूमी जिंदगी विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण केल्यावर हा ठराव मंजूर झाला. 

मधल्या पेठांतील बांधकामे रखडली 
जुन्या पुण्यातील मधल्या पेठांतील बांधकाम आराखडे मंजूर करण्याची 2012 पासून प्रक्रिया रखडली असून, त्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विशाल धनकवडे यांनी केली. गोपाळ चिंतल, हेमंत रासने यांनीही त्याला अनुमोदन दिले. या वेळी नगर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले, ""मंजूर झालेल्या विकास आराखड्यातील विकास नियंत्रण नियमावलीत काही बदल करायचे आहेत. त्याबाबत सभागृहात प्रस्ताव सादर करून राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल. त्याला मंजुरी मिळाल्यावर लगेचच आराखडे मंजूर करण्यात येतील.'' 

जन्म-मृत्यू एकाच दिवशी ! 
महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने एकाच दिवशी एकाच व्यक्तीचा जन्माचा आणि मृत्यूचा दाखला दिला आहे, असे अरविंद शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत दाखवून दिले. त्याची दखल घेत आयुक्त कुणाल कुमार यांनी याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश प्रशासनाला दिला.

Web Title: pune news pmc bjp