विश्‍वविक्रमी ढोलवादनासाठी महापालिका सज्ज 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

पुणे - ढोलवादनाच्या विश्‍वविक्रमी निनादाचा अनुभव पुणेकरांना देण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले असून, शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुमारे ३६०० ढोलवादकांची नोंदणी झाली आहे. जागतिक विक्रम होणार असल्यामुळे ही संख्या आणखी वाढण्याचा अंदाज महापालिकेने  वर्तविला आहे. 

पुणे - ढोलवादनाच्या विश्‍वविक्रमी निनादाचा अनुभव पुणेकरांना देण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले असून, शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुमारे ३६०० ढोलवादकांची नोंदणी झाली आहे. जागतिक विक्रम होणार असल्यामुळे ही संख्या आणखी वाढण्याचा अंदाज महापालिकेने  वर्तविला आहे. 

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेने विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत सुमारे पाच हजार ढोलांचा निनाद एकाच वेळी करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. त्यासाठी विशेष ताल निश्‍चित करण्यात आले आहेत. म्हाळुंगे बालेवाडीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील खुल्या मैदानात रविवारी ढोलवादन होणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आणि आमदार, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. 

ढोलवादक रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून स्टेडियममध्ये येण्यास सुरवात करतील. दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांची नोंदणी होईल. त्यानंतर दुपारी दोन ते सायंकाळी चारदरम्यान सराव होईल. त्यानंतर विश्रांती घेऊन सायंकाळी पाच ते पाच वाजून २५ मिनिटांपर्यंत ढोलवादनाचा मुख्य कार्यक्रम होईल. त्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मोहोळ यांनी केले आहे. सुमारे सात वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये १५०० ढोलांचे एकत्रित वादन झाले होते. त्यानंतर राज्यात पहिल्यांदाच इतक्‍या मोठ्या संख्येने ढोलवादन होणार असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले. 

ढोलवादनासाठी ८० पथकांतील सुमारे ३६०० ढोलवादकांनी महापालिकेकडे नोंदणी केली असून ही संख्या आणखी वाढेल, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. 

Web Title: pune news pmc dhao wadan