मंदीचा फटका बसण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पुणे - बांधकाम क्षेत्रातील मंदीचा फटका महापालिकेला पुढील आर्थिक वर्षातही बसण्याची शक्‍यता महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी अर्थसंकल्पात व्यक्त केली आहे. त्यांनी या खात्याचे अपेक्षित उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल साडेचारशे कोटी रुपयांनी कमी केले आहे. बांधकामाबरोबरच पाणीपट्टी आणि मिळकतकरातही घट होण्याची शक्‍यता आहे. मात्र मिळकतकराचे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे. 

पुणे - बांधकाम क्षेत्रातील मंदीचा फटका महापालिकेला पुढील आर्थिक वर्षातही बसण्याची शक्‍यता महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी अर्थसंकल्पात व्यक्त केली आहे. त्यांनी या खात्याचे अपेक्षित उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल साडेचारशे कोटी रुपयांनी कमी केले आहे. बांधकामाबरोबरच पाणीपट्टी आणि मिळकतकरातही घट होण्याची शक्‍यता आहे. मात्र मिळकतकराचे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे. 

महापालिकेच्या आगामी म्हणजे 2018-19च्या अर्थसंकल्पात बांधकाम खात्याला केवळ साडेसातशे कोटी यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट चालू म्हणजे 2017-18 या वर्षी 1 हजार 165 कोटी रुपयांचे होते. प्रत्यक्षात मात्र 2017 च्या डिसेंबरअखेर बांधकाम खात्याला जेमतेम 329 कोटी 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न येत्या मार्चअखेर पाचशे कोटींपर्यंत पोचण्याची शक्‍यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या वर्षभरात बांधकाम खात्याला जवळपास सहाशे ते साडेसहाशे रुपये कमी उत्पन्न मिळणार असल्याचे प्रशासनाने गेल्या काही दिवसांमध्ये घेतलेल्या आढाव्यावरून स्पष्ट होत आहे. 

वस्तू आणि सेवाकर; तसेच बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. शहरात गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढलेल्या बांधकाम क्षेत्राला नोटाबंदीपाठोपाठ जीएसटीचा फटका बसला आहे. त्याचा परिणाम, बांधकाम क्षेत्रातील आर्थिक उलाढालीवर झाला आहे. 

दरम्यान, पाणीपुरवठा खात्याच्या उत्पन्नातही 40 कोटी रुपयांची घट होईल, असा अंदाज आहे. पाणीपुरवठा खात्याचे उत्पन्न चालू वर्षी 379 कोटी 67 लाख रुपये गृहीत धरले होते. प्रत्यक्षात डिसेंबरअखेर 149 कोटी 56 लाख रुपये जमा झाले आहे. 2018च्या मार्चअखेर या खात्याला आणखी 50 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. या पार्श्‍वभूमीवर पाणीपुरवठा खात्याला आगामी वर्षासाठी 339 कोटी 90 लाखाचे उद्दिष्ट आहे. 

मिळकतकराचे उद्दिष्ट वाढविले 
मिळकतकराच्या उत्पन्नात मात्र वाढ होण्याची आशा अर्थसंकल्पात मांडली आहे. या खात्याचे उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत पावणेदोनशे कोटी रुपयांनी वाढेल, असा अंदाज आहे. या खात्याला चालू वर्षी 1 हजार 433 कोटी 60 लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. डिसेंबरअखेर त्या खात्याला केवळ 607 कोटी 47 लाख रूपये उत्पन्न मिळाले; तर मार्चपर्यंत आणखी सुमारे 250 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळून एकूण मिळकतकराचे उत्पन्न 850 कोटींपर्यंत पोचणार आहे. म्हणजेच उद्दिष्टापेक्षा सुमारे 600 कोटींनी उत्पन्न कमी होणार आहे. मिळकतकराचे उत्पन्न दर वर्षी अपेक्षेप्रमाणे मिळत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदा हे उत्पन्न कमी मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र उत्पन्न घसरत असतानाही पुढील वर्षी या खात्याला वाढीव उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते 1 हजार 619 कोटी 91 लाख रुपयांचे आहे. मात्र, मिळकतकरातील प्रस्तावित 15 टक्के वाढीमुळे या खात्याच्या उत्पन्नात 130 ते 135 कोटी रुपयांची भर पडेल, असे गृहीत धरण्यात आले असले तरी स्थायी समितीकडून ती वाढ मान्य होण्याची शक्‍यता नाही. 
कर्ज नाही 

"कर्जसंकल्प' नाही 
महापालिकेच्या अर्थसंकल्पात (2017-18) दोनशे कोटी रुपयांचे कर्जरोखे घेण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, यंदा कोणत्याही प्रकल्पांसाठी बाजारातून कर्ज घेतले जाणार नसल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नातूनच प्रकल्पांची कामे करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: pune news PMC tax Commissioner Kunal Kumar