पाणी, वाहतुकीचा  प्रश्‍न सोडवा

पाणी, वाहतुकीचा  प्रश्‍न सोडवा

पुणे - शहरालगतचा भाग आणि स्वस्तात घरे मिळाल्याने गेल्या दहा वर्षांत शिवणे, शिवणे-उत्तमनगर या गावांचा आकार वेगाने वाढला. पण ही गावे विस्तारत असतानाही त्यांच्या विकासाचे नियोजन झाले नाही. परिणामी, जागोजागी उभी राहिलेली वेडीवाकडी बांधकामे, अपुरे रस्ते, कोलमडणारी वाहतूक, अतिक्रमणे आणि मोकळ्या जागांवरील कचऱ्याचे ढीग, हे या गावांमधील प्रमुख प्रश्‍न आहेत. तसेच पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याचीही रहिवाशांची ओरड आहे. ही गावे महापालिकेत घेतल्यानंतर चांगले रस्ते, पाणी आणि वाहतूक, इत्यादींचे प्रश्‍न कायमचे सुटतील, असे या रहिवाशांना वाटत आहे. त्यामुळे ते सोडविण्याचे आव्हान महापालिका प्रश्‍नासासमोर आगामी काळात असणार आहे.

पाणीपुरवठ्याच्या ठरावाकडे दुर्लक्ष
महापालिकेच्या हद्दीतलगतच्या गावांना महापालिका पाणीपुरवठा करू शकतो. त्याबाबतचा ठराव संबंधित ग्रामपंचायतींनी दिल्यास महापालिकेकडून त्यावर कार्यवाही होते. त्यानुसार वारजे-माळवाडीलगतच्या काही गावांना पाणीपुरवठा करण्याचा ठराव संबंधित ग्रामपंचायतींनी महापालिकेला दिला आहे. मात्र महापालिकेच्या शहर सुधारणा समितीकडे तो पडून असून, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे नगरसेवक सचिन दोडके यांनी सांगितले. या गावांमधील पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यामुळे त्यांना टॅंकरद्वारे पुरेसे पाणी देण्याचा प्रयत्न आहे. यांसंदर्भात महापौर मुक्‍ता टिळक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे दोडके यांनी सांगितले. गावकऱ्यांना महापालिकेकडून पाणी मिळण्याची अपेक्षा आहे.

शिवणे
दोन्ही गावांना जोडणाऱ्या शिंदे पूल ते कोंढवा गेटपर्यंतचा रस्ता अरुंद असल्याने गावात पोचण्यासाठी नेमका किती वेळ लागणार? हे वाहतूक कोंडीमुळे सांगणे कठीणच आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाळामुळे सध्या या रस्त्याच्या दुरवस्थेत आणखी भर पडली आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळित होत असल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे अतिक्रमणांनी रस्ता व्यापला जात असून, वाहनांच्या वर्दळीच्या तुलनेत तो अपुरा ठरत आहे. नागरिक, वाहनचालकांची तक्रार होऊनही रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगण्यात आले. वाढत्या नागरीकरणामुळे या गावात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. तो उचलून नेण्याची यंत्रणाच अद्याप या या ठिकाणी उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे गावात ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा असेल, त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्दळीच्या प्रमुख रस्त्यावर अनेक ठिकाणी कचरा पडलेला आहे. कचऱ्याची समस्या सोडविण्याची मागणी या गावातील रहिवाशांची आहे. रस्त्यालगतची अतिक्रमणे काढून ते मोकळे करावेत, असेही त्यांचे म्हणणे आहे.

शिवणे गावाची लोकसंख्या सुमारे २० ते २५ हजार इतकी आहे. त्यामुळे रस्ते, पाणी, कचऱ्याची समस्या सोडवितानाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गावकऱ्यांची अपेक्षा आहे. 

शिवणे-उत्तमनगर
शिवणे गावापाठोपाठ शिवणे-उत्तमनगरही मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. परिसरात अजूनही नागरिकरण वाढतच आहे. कमी किमतीत घर मिळत असल्याने येथील घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी, गावात नवी बांधकामे वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत असल्याचे गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर स्पष्ट झाले. 

महापालिकेत गाव सामावून घेण्याच्या हालचाली सुरू असल्याने आतापासूनच पाणीपुरवठा योजना राबवावी, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. तसेच कचऱ्याची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षात प्रयत्न झाले नसल्याचेही त्यांच म्हणणे आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने गावालगतचे रस्ते आणि ओढ्या-नाल्यांमध्ये कचरा टाकण्यात आला आहे. प्रमुख रस्त्याच्या जवळ व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने वाहतूक कोंडीचा रहिवाशांना फटका बसत आहे. त्यातच अवजड वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालणे अशक्‍य झाले आहे. त्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे. या भागातील सोसायट्यांचे प्रमाण वाढल्याने सांडपाणी वाहिन्या टाकण्याची गरज असल्याचेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारी यंत्रणा असावी, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com