पीएमपीमधील 14 वाहतूक निरीक्षक निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

पुणे - चालक, वाहकांच्या गैरहजेरीवर गेल्या तीन महिन्यांपासून नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्यामुळे आणि त्यांची अनुपस्थिती 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झाल्यामुळे पीएमपीमधील 26 पैकी 14 वाहतूक निरीक्षकांना प्रशासनाने शुक्रवारी निलंबित केले. पीएमपीच्या 13 पैकी 7 आगारांतील निरीक्षकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. सातत्याने अनुपस्थित राहणाऱ्या कामगारांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा प्रशासनाने उगारल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

पीएमपीची शहरात 13 आगार आहेत. प्रत्येक आगारात दोन वाहतूक निरीक्षक आहेत. चालक (ड्रायव्हर) व वाहक (कंडक्‍टर) यांच्या रजा, अनुपस्थितीची नोंद घेऊन उपाययोजना करणे, त्यांच्या कामाचे वाटप करणे, आगारांमधून होणारी बस वाहतूक सुरळीत ठेवणे आदी जबाबदाऱ्या निरीक्षकांना दिल्या आहेत. गेल्यावर्षी ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान स्वारगेट, नरवीर तानाजी वाडी, कोथरूड, हडपसर, पुणे स्टेशन, पिंपरी आणि कात्रज आगारांतील ड्रायव्हर-कंडक्‍टरच्या अनुपस्थितीचे प्रमाण वाढले होते. ते दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झाले होते. त्याचा विपरीत परिणाम बस वाहतुकीवर आणि उत्पन्नावर झाला. या निरीक्षकांनी त्या बाबत वेळीच कायदेशीर कारवाई आणि आवश्‍यक उपाययोजना केल्या नाहीत, असे प्रशासनाने केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. 

बालेवाडी, निगडी, भोसरी, मार्केटयार्ड, शेवाळवाडी, भेकराईनगर या आगारांतील कंडक्‍टर- ड्रायव्हरच्या अनुपस्थितीचे प्रमाण 4- 5 टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. परंतु ते दहा टक्‍क्‍यांच्या पुढे गेले, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एका निलंबित अधिकाऱ्याने नोटीस स्वीकारून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यास असहकार्य केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध जाहीर प्रकटन देऊन प्रशासनाने कारवाईस प्रारंभ केला आहे.

Web Title: pune news PMP 14 Traffic Inspector Suspended