पीएमपीच्या ठेकेदारांचा अचानक संप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

पुणे - पीएमपीच्या भाडेतत्त्वावरील बसच्या ठेकेदारांनी गुरुवारी दुपारी दोन वाजता अचानक संप पुकारल्यामुळे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व बीआरटी मार्गांवरील सेवा काही काळ विस्कळित झाली; परंतु पीएमपी प्रशासनाने जादा बस उपलब्ध केल्यामुळे संपाची तीव्रता आज तरी जाणवली नाही. दरम्यान, ठेकेदारांनी शुक्रवारी सकाळपर्यंत संप मागे न घेतल्यास त्यांच्यावर अत्यावश्‍यक सेवा कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. 

पीएमपीच्या सरासरी सुमारे 1550 बस विविध मार्गांवर असतात. त्यात 440 बस ठेकेदारांच्या आहेत. त्यातील सुमारे 380 बस दररोज मार्गावर धावतात. या बस प्रामुख्याने बीआरटी मार्गांवर प्रवाशांची वाहतूक करतात. गुरुवारी दुपारी दोननंतर ठेकेदारांनी बस सोडल्या नाहीत. त्यामुळे अडीचच्या सुमारास ठेकेदारांनी संप सुरू केल्याचे दिसून आले. कोणतीही पूर्वसूचना न देता ठेकेदारांनी संप केल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. 

पर्यायी व्यवस्था म्हणून ज्या बस सायंकाळी साडेसात वाजता डेपोत दाखल होताच, त्या रात्री साडेदहापर्यंत सुरू ठेवण्यात आल्या. तसेच नादुरुस्त बसपैकी 

100 जादा बस मार्गांवर आणण्यात आल्या. त्यामुळे सुमारे 300 जादा बस पीएमपी प्रशासनाने उपलब्ध केल्या. त्यासाठी सुमारे 500 वाहक-चालकांना "ओव्हरटाइम' देण्यात आला. साप्ताहिक सुटी, रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही वेळप्रसंगी शुक्रवारी कामावर बोलविण्यात येईल, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले. 

संप कशामुळे? 

गर्दीच्या वेळेत एक तासाहून अधिक वेळ बंद पडणाऱ्या कंत्राटदारांच्या बसला पीएमपी प्रशासनाने सुमारे एक हजार रुपये दंड सुनावला आहे. ठेकेदारांना हा 
दंड मंजूर नव्हता. काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली; परंतु त्यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. तसेच दोन्ही महापालिकांशी गेल्या दोन दिवसांपासून पीएमपी प्रशासनाचा वाद सुरू आहे. त्यामुळे काही लोकप्रतिनिधींनी फूस दिल्यामुळे अचानक संप झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

अत्यावश्‍यक सेवा कायद्यान्वये कारवाई 
याबाबत पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता संप करून प्रवाशांना वेठीस धरण्याची कृती चुकीची आहे. प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून बससेवा सुरळीत केली आहे. बससेवा अत्यावश्‍यक सेवांमध्ये येते. त्यामुळे संबंधित ठेकेदारांवर अत्यावश्‍यक सेवा कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी राज्य सरकारला पत्र पाठविले असून, तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही सायंकाळी चर्चा झाली. त्यामुळे ठेकेदारांनी शुक्रवारी सकाळपर्यंत संप मागे न घेतल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.'' संपानंतर पीएमपीचे कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल मुंढे यांनी त्यांचे कौतुक केले. 

Web Title: pune news pmp bus