विशेष व्यक्तींच्या आसनावर बसल्यास दंडात्मक कारवाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसगाड्यांमध्ये विशेष व्यक्तींसाठी (अंध, अपंग) आरक्षित असलेली आसनव्यवस्था त्यांच्यासाठीच राहणार आहे. या संदर्भात चालक आणि वाहकांना पुन्हा सूचना करण्यात येणार आहे. त्यानुसार विशेष व्यक्तींच्या आसनांवर बसलेल्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्‍यता आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांबाबतच्या निर्णयाचीही काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. 

पीमपीच्या बसगाड्यांमधील आसनक्षमतेपैकी ५० टक्के जागा म्हणजे डावी बाजू महिलांसाठी राखीव आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिक आणि विशेष व्यक्तींसाठी प्रत्येकी दोन आसने राखीव आहेत. त्यापैकी महिलांना त्यांच्या जागेवर प्राधान्य मिळत असल्याचे दिसून येते. मात्र, ज्येष्ठ नागरिक आणि विशेष व्यक्तींच्या आरक्षित जागा त्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, गर्दीच्या वेळी अशा व्यक्तींना बसमध्ये चढ-उतारही करता येत नाही. त्यामुळे त्यांना बसथांब्यांवर ताटकळत राहावे लागत असल्याची या व्यक्तींची तक्रार आहे. या पार्श्‍वभूमीवर विशेष व्यक्तींनी ‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन आरक्षित जागेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. जागा मिळत नसल्याने हाल होत असल्याचेही त्यांनी मुंढे यांना सांगितले. त्यानंतर विशेष व्यक्‍तींच्या जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या जातील, असे मुंढे यांनी सांगितले. मुंढे म्हणाले, ‘‘बसमध्ये विशेष व्यक्तींना राखीव असलेल्या जागांवर अन्य प्रवासी बसू नये. ही बाब आता गांभीर्याने घेण्यात येणार आहे. याबाबत वाहकांनीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे. तसे न झाल्यास कारवाई होईल. या संदर्भात आठवड्याला आढावा घेण्यात येईल.’’

Web Title: pune news pmp bus