बसचा टॉप गिअर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

पुणे - शहरातील गर्दीच्या ११ रस्त्यांवर दर एक ते दोन मिनिटांनी बससेवा उपलब्ध असल्याचा पीएमपी प्रशासनाने केलेला दावा फोल ठरला आहे, मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर बस किमान ५-१० मिनिटांनी मिळत असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत गुरुवारी दिसून आले. गाड्या वेळेत धावत आहेत; पूर्वीपेक्षा वारंवारताही वाढली आहे मात्र, गर्दीच्या ठिकाणी पोचण्यासाठीची बससंख्या अपुरी असल्याचेही आढळले.

पुणे - शहरातील गर्दीच्या ११ रस्त्यांवर दर एक ते दोन मिनिटांनी बससेवा उपलब्ध असल्याचा पीएमपी प्रशासनाने केलेला दावा फोल ठरला आहे, मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर बस किमान ५-१० मिनिटांनी मिळत असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत गुरुवारी दिसून आले. गाड्या वेळेत धावत आहेत; पूर्वीपेक्षा वारंवारताही वाढली आहे मात्र, गर्दीच्या ठिकाणी पोचण्यासाठीची बससंख्या अपुरी असल्याचेही आढळले.

शहरातील ११ प्रमुख रस्त्यांवर म्हणजेच पीएमपीच्या दृष्टीने ‘ट्रंक रूट’वर किमान १ ते २ मिनिटांनी बससेवा उपलब्ध असल्याचा दावा पीएमपीचे अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापकीय  संचालक तुकाराम मुंढे यांनी २८ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत केला होता. त्या ११ मार्गांपैकी ४ प्रमुख मार्गांवर ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी पाहणी केली. त्यात एक- दोन मिनिटे नव्हे, तर किमान ५-१० मिनिटांनी बससेवा उपलब्ध असल्याचे दिसले. हे सर्व मार्ग गर्दीचे असल्याने त्याठिकाणी बससंख्या जास्त असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. उदा. - कात्रज- शिवाजीनगर रस्त्यावर दर एक- दोन मिनिटांना बस उपलब्ध आहे, असे प्रशासन सांगते. परंतु, या रस्त्यावरून अन्य मार्गांवरीलही बस धावतात. त्यामुळे शिवाजीनगर- कात्रज दरम्यानच्या थांब्यांवरील प्रवाशांना दर एक मिनिटात बस मिळू शकते. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या बससंख्येनुसार पीएमपीने दावा केल्याचे आढळून आले. असाच प्रकार अन्य गर्दीच्या मार्गांवरही आढळून आला.

एक- दोन मिनिटांत बस आहेतच 
पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक सुनील गवळी म्हणाले, ‘‘शहरातील सर्वाधिक गर्दीच्या ११ रस्त्यांवर दर एक- दोन मिनिटांनी प्रवाशांना बससेवा मिळेल, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार बसची संख्याही वाढविण्यात आली आहे. परंतु, मध्यभागातून उपनगरांच्या दिशेने जाताना किंवा येताना अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे बस गर्दीत अडकतात. त्याचा परिणाम वेळापत्रकावर होतो. म्हणूनच अनेकदा पाठोपाठ बस आल्याचे प्रवाशांकडून सांगितले जाते. उदा. - बाजीराव रस्त्यावरून दर तासाला सुमारे ३५० बस जातात, त्यामुळे या रस्त्यावर दर एक मिनिटाने बस उपलब्ध आहेच. शहरातील सर्वच रस्त्यांवर प्रवाशांना बससाठी थांबण्यासाठीचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ट्रंक रूटवरील सध्याचे नियोजन हा त्याचाच एक भाग आहे.’’ 

सिमला ऑफिस ते हिंजवडी 
सिमला ऑफिस थांबा - ‘सिमला ऑफिस ते हिंजवडी रस्ता’ या मार्गावर पुणे स्टेशन ते हिंजवडी, डांगे चौक ते हिंजवडी फेज- ३, वाकड ते हिंजवडी, मनपा ते हिंजवडी या बस ५ ते ७ मिनिटांच्या अंतराने बसथांब्यावर येतात, असे दिसून आले. या संदर्भात हिंजवडीकडे जाणाऱ्या प्रवाशांना विचारले असता प्रवासी म्हणाले, ‘‘आम्हाला दररोज हिंजवडीकडे जाणारी बस ही किमान १० ते १५ मिनिटांच्या अंतराने मिळते. अनेकदा १५ मिनिटांनंतरही बस मिळत नाही.’’

डेक्कन ते कोथरूड डेपो  
नळस्टॉप थांबा - डेक्कनमार्गे कोथरूड डेपो दिशेने जाण्यासाठी बस दर सात ते दहा मिनिटांदरम्यान येत होत्या. डेक्कन, कोथरूडमार्गे पुढे जाणाऱ्या भूगाव, घोटावडे, पौड रस्ता, पिरंगुट आदी मार्गांवर जाणाऱ्या बसचीही संख्या जास्त आहे. परंतु डेक्कन ते कोथरूडदरम्यानच्या प्रवाशांना या बससेवेचाही लाभ घेता येत असल्यामुळे दर दोन मिनिटांनी नव्हे, तर दर ५-१० मिनिटांनी बस मिळत असल्याचे दिसून आले. 

कात्रज ते स्वारगेट 
धनकवडी थांबा - स्वारगेट - कात्रज दरम्यान जाण्यासाठी या मार्गावर दर दोन मिनिटांनी बस धावत असल्याचे दिसून आले. परंतु स्वारगेटच्या पुढे अन्य मार्गांवर जाण्यासाठी प्रवाशांना बसची वाट किमान १०-१५ मिनिटे पाहावी लागत असल्याचे आढळले. विशेषत- दूरच्या अंतराच्या बससाठी जास्त वाट पाहावी लागते. खडकी बाजार, निगडी, येरवडा, कोंढणपूर, हिंजवडी या मार्गांवरील बससाठी प्रवाशांना बराच वेळ वाट पाहावी लागते. 

डेक्कन ते वारजे-माळवाडी 
डेक्कन कॉर्नर थांबा - वारजे माळवाडीला जाण्यासाठी वेळेत बस मिळेल या खात्रीने काही प्रवासी डेक्कन पीएमपी बस स्थानकावर थांबले होते... पण, एका मिनिटात नव्हे, तर दहा मिनिटांनंतर बस येत असल्याचे दिसून आले. वारजे- माळवाडी, कोथरूड, कर्वेनगर, पौडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने बस येत होत्या.

औंध ते डांगे चौक 
औंधगाव थांबा - औंध रस्त्यावरून रावेत, चिंचवडगाव, निगडी, हिंजवडी आदी मार्गांवर बस धावतात. या रस्त्यावरून बहुतांश बस डांगे चौक आणि हिंजवडीच्या दिशेने जातात. त्यामुळे त्या मार्गावरील बसची संख्या पुरेशी आहे. या रस्त्यावर एक किंवा दोन मिनिटे इतक्‍या वेळात डांगे चौकाच्या दिशेने जाणारी बस मिळत असल्याचे दिसून आले.

हे आहेत ते अकरा मार्ग 
डेक्कन ते कोथरूड डेपो रस्ता - 

    एकूण बससंख्या १४५, खेपा १६८१, प्रतितास बससंख्या १०५ 
 कात्रज ते स्वारगेट रस्ता - 
    एकूण बससंख्या २९३, खेपा ३३७६, प्रतितास बससंख्या २११ 
 डेक्कन ते वारजे माळवाडी रस्ता - 
    एकूण बससंख्या १५५, खेपा १६१९, प्रतितास बसंख्या १०१
 सिमला ऑफिस ते हिंजवडी रस्ता - 
    एकूण बससंख्या ७६, खेपा ७६०, प्रतितास बससंख्या ४८
 औंध ते डांगे चौक रस्ता - 
    एकूण बससंख्या १११, खेपा ११७५, प्रतितास बससंख्या ७३
 स्वारगेट ते शिवाजीनगर रोड - 
    एकूण बससंख्या १७२, खेपा २२४८, प्रतितास बससंख्या १४०
 मनपा भवन ते निगडी रोड - 
    एकूण बससंख्या १५८, खेपा १६३४, प्रतितास बससंख्या १०२
 येरवडा ते खराडी बायपास रोड - 
    एकूण बससंख्या १४२, खेपा १६९०, प्रतितास बससंख्या १०५
 महात्मा गांधी स्थानक ते हडपसर रोड - 
    एकूण बससंख्या २०८, खेपा २५०२, प्रतितास बससंख्या १५६
 कासारवाडी ते भोसरी रोड - 
    एकूण बससंख्या ४९, खेपा ५३४, प्रतितास बससंख्या ३३
 संगमवाडी ते विश्रांतवाडी रोड - 
    एकूण बससंख्या ७३, खेपा ७४९, प्रतितास बससंख्या ४७ 

Web Title: pune news pmp bus