पीएमपी अपघातातील जखमींना मदत केव्हा ? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

बिबवेवाडी - पीएमपी बसच्या अपघातातील जखमींना मदत केव्हा मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सोमवारी बस धडकून आठ वाहनांचे नुकसान झाले आहे. एका दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाले आहेत. त्यात वृत्तपत्र विक्रेता गंभीर जखमी झाला असून, त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

बसच्या चाकाखाली दुचाकी आल्याने काळूराम वनाजी नकुमपरमार यांचा मृत्यू झाला. घरातील ते एकमेव कमावते असल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

बिबवेवाडी - पीएमपी बसच्या अपघातातील जखमींना मदत केव्हा मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सोमवारी बस धडकून आठ वाहनांचे नुकसान झाले आहे. एका दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाले आहेत. त्यात वृत्तपत्र विक्रेता गंभीर जखमी झाला असून, त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

बसच्या चाकाखाली दुचाकी आल्याने काळूराम वनाजी नकुमपरमार यांचा मृत्यू झाला. घरातील ते एकमेव कमावते असल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील मूळगावचे नकुमपरमार सोळा वर्षांपूर्वी कोंढवा येथे व्यवसायासाठी स्थायिक झाले होते. त्यांना तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे, भाड्याने दुकान घेऊन किराणा मालाचा व्यवसाय करत होते. काही वर्षांनी एक गुंठा जागा घेऊन स्वत:च्या जागेत दोन दुकाने काढून किराणा मालाचा व्यवसाय सुरू केला. त्यांचा मोठा मुलगा गणेश काळूराम दुकानामध्ये मदत करीत होता, तर मधला मुलगा भावेश मार्केट यार्डात किराणामालाच्या दुकानात कामाला असून, धाकटा मुलगा करण दहावीमध्ये शिकतो. मुलीचे लग्न झाले आहे. त्या वेळी परमार यांनी त्यांचे एक दुकान विकले होते. पीएमपी प्रशासनाने त्यांच्या कुटुंबाला मदत केली नसल्याचे परमार यांच्या नातेवाइकांनी सांगितले. 

योगेशवर दोन शस्त्रक्रिया 
गंभीर जखमी झालेला वृत्तपत्र विक्रेता योगेश कुडलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या डोक्‍यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. उपचाराचा रोजचा खर्च पाहता वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे योगेशला आर्थिक मदत देणार असल्याचे सुनील कडू यांनी सांगितले. योगेशचे वडील रघुनाथ कुडले अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. सोमवारी तब्येत बरी नसल्यामुळे योगेशची आई व योगेश वृत्तपत्र विक्रीसाठी स्टॉलवर उभे होते. काही काळासाठी योगेशची आई घरी गेली. तेव्हा हा अपघात झाला. योगेशला एक वर्षाचा मुलगा असून, मुलगी चार वर्षांची आहे. मुळातच घरची परिस्थिती हलाखीची आहे. घरातील कर्ता माणूस गंभीर जखमी झाल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. 

टेंपोच्या नुकसानीने झळ 
अपघातामध्ये छोटा हत्ती टेंपोचा चालक हरिचंद्र भरगुडे यांच्या पोटाला व छतीला मार लागला आहे. त्यांच्यावर  खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी भरगुडे टेंपो चालवत होते. अपघातामध्ये त्यांच्या टेंपोचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद पडल्याचे भरगुडे यांच्या मुलीने सांगितले. 

दरम्यान, अपघातप्रकरणी पोलिसांनी बसचालक मनोज धोंडीबा भालशंकर याला सोमवारी संध्याकाळी अटक केली. भालशंकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून, पोलिस उपनिरीक्षक बी. पी. देवकाते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहेत. 

Web Title: pune news pmp bus accident