पीएमपी बसथांब्यांना अतिक्रमणाचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

पुणे - पीएमपीच्या बस थांब्यांभोवतालचे अतिक्रमण काढण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालयांना दिला असला तरी, शहरातील परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे मंगळवारी दिसून आले. थांब्याभोवती उभ्या केलेल्या वाहनांवर पोलिसांकडून अद्याप कारवाई झालेली नाही. महापौर मुक्ता टिळक यांच्या आदेशाकडेही प्रशासनाने काणाडोळा केला आहे.

शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे पाच हजार बस थांबे आहेत. त्यापैकी पुणे शहरात सुमारे १५०० बस थांब्यांवर ‘शेल्टर्स’ आहेत. मात्र, या थांब्यांसमोर रिक्षा, मोटारी आदी खासगी वाहने सर्रास उभी केली जातात. काही ठिकाणी पथारी व्यावसायिकांनीही अतिक्रमण केल्याचे दिसून येते. पीएमपी प्रशासनाने या बाबत महापालिकेशी सातत्याने पत्रव्यवहार केला. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना अतिक्रमणे काढून टाकण्याचा आदेश दिला. वाहतूक पोलिसांनाही बस थांब्यांभोवती उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची विनंती केली. अतिक्रमण विभागाने आदेश देऊन तीन दिवस झाले तरी, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. 

महापौरांनीही थांब्याभोवतीच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. क्षेत्रीय कार्यालयांकडून त्याची अंमलबजावणीच झालेली नाही. या बाबत अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे विचारणा केली असता, कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांची आहे. त्यांच्याकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे, असे सांगण्यात आले. वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालयात विचारले असता, संबंधित पोलिस निरीक्षकांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: pune news pmp bus encroachment