एका क्‍लिकवर पीएमपीचे अपडेट !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

बसच्या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी

बसच्या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी
पुणे - बस कोणत्या ठिकाणी आहे, ती किती वाजता निघाली आणि किती वाजता पोचली. थांब्यावर किती वेळ थांबली. त्यात किती प्रवासी होते. किती उत्पन्न मिळाले आदी माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक नियंत्रण कक्षात मिळत आहे. त्यामुळे बसचालक आणि वाहकांना आता थांब्यावर वेळेत बस पोचविणे भाग पडणार आहे. त्यामुळे वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी आता शक्‍य होणार आहे.

पीएमपीच्या वेळापत्रकानुसार बससेवा सुरू राहावी, यासाठी इंटेलिजंट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) कार्यक्षमपणे सुरू केली आहे. तिकिटांच्या सुसूत्रीकरणासाठी ऑटोमॅटिक फेअर कलेक्‍शन सिस्टिम (आयएफसीएस) देखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तिकिटांची रक्कम, दर दिवशीचे प्रत्येक बसचे उत्पन्न आणि निर्धारित उत्पन्नाच्या तुलनेत येणारी तूट आदी गोष्टींवर नजर ठेवणे शक्‍य झाले आहे.

पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे म्हणाले, 'नियंत्रण कक्षाद्वारे बससेवेतील कमतरता शोधून, त्यात सुधारणा करणे शक्‍य होणार आहे. प्रत्येक बसमधील इत्थंभूत माहिती कक्षातून पीएमपी प्रशासनाला एका क्‍लीकवर मिळत आहे. त्या आधारे संबंधित चालक, वाहक आणि अधिकाऱ्यांविरुद्ध पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. ब्रेक डाउन झाल्याची माहिती मिळाल्यावर दुरुस्तीसाठी संबंधित व्हॅन काही वेळातच त्या ठिकाणी पोचणार आहे.''

कर्मचाऱ्यांसाठी प्रात्याक्षिक
वाहक- चालकांचे गट करून त्यांना कक्षातील यंत्रणेची माहिती देण्यात येत आहे. पीएमपी तोट्यात का आहे. प्रत्येक बसवर दररोज होणारा खर्च आणि बसचे रोजचे उत्पन्न, त्यांच्याकडून बसच्या वेळापत्रकात होणाऱ्या चुका, भविष्यातील आवश्‍यक सुधारणा आदी विषयीची माहिती त्यांना या वेळी देण्यात येत आहे. या कक्षातील माहिती तीन ते 30 सेकंदांत अपडेट होते. आतापर्यंत सुमारे 7 हजार कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकांसह येथील यंत्रणेचे काम समजावून सांगण्यात आले आहे.

या नियंत्रण कक्षामुळे आता काही कर्मचाऱ्यांकडून होणारे गैरप्रकार बंद होतील. प्रवाशांमध्ये पीएमपीबद्दल विश्‍वासार्हता निर्माण व्हावी, त्यांना वेळेत आणि पारदर्शक सेवा मिळावी, या दृष्टिकोनातून हा कक्ष सुरू केला आहे. महिलांसाठीच्या "तेजस्विनी बस'ची निविदा प्रक्रिया सुरू आहे. देशात काही ठिकाणी "इलेक्‍ट्रिक बस'ची चाचणी घेण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतुकीचा लाइव्ह डाटा असलेली यंत्रणा केवळ पीएमपीतच आहे.
- तुकाराम मुंढे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

Web Title: pune news pmp update on website