‘स्थायी’च्या निर्णयावर नव्या बसचे भवितव्य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन्ही स्थायी समित्यांनी वेळेत ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, तर दोन्ही शहरांतील प्रवाशांसाठी पीएमपीच्या ताफ्यात २०० बस दाखल होण्यास महिनाअखेरीस सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६७ बस तयार झाल्या आहेत. प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पार पडली, तर पंधरा दिवसांनंतर या बस मार्गांवर धावू शकतील. 

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन्ही स्थायी समित्यांनी वेळेत ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, तर दोन्ही शहरांतील प्रवाशांसाठी पीएमपीच्या ताफ्यात २०० बस दाखल होण्यास महिनाअखेरीस सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६७ बस तयार झाल्या आहेत. प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पार पडली, तर पंधरा दिवसांनंतर या बस मार्गांवर धावू शकतील. 

दोन्ही महापालिकांनी गेल्या वर्षी अर्थसंकल्पात २०० बस खरेदी करण्यासाठी सुमारे ६६ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यातील १२० बस पुणे महापालिका, तर ८० बस पिंपरी-चिंचवड महापालिका खरेदी करणार आहे. या बस मध्यम आकाराच्या (मिडी) असून, डिझेलवर धावणाऱ्या आहेत. त्यात ३२ प्रवासी बसू शकतात. बस खरेदीची सहा महिन्यांपूर्वी ऑर्डर देताना पुणे महापालिकेने १० कोटी ३८ लाख आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने ६ कोटी रुपये दिले आहेत. मात्र उर्वरित ७३ लाख पिंपरी-चिंचवडकडे बाकी आहेत. आता एकूण रकमेच्या ५० टक्के रक्कम दोन्ही महापालिकांनी द्यायची आहे. त्यानुसार पुण्याने २० कोटी २० लाख, तर पिंपरीने १४ कोटी ७३ लाख रुपये द्यायचे आहेत. त्यानंतर ६७ बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६० बस आणि त्यानंतर उर्वरित बस येणार आहेत. शेवटच्या टप्प्यातील बस पोचेपर्यंत दोन्ही महापालिकांनी खरेदी रकमेच्या ९५ टक्के उत्पादक कंपनीला द्यायची आहे. 

बस खरेदीसाठी ३४ कोटी रुपये दोन्ही महापालिकांनी उपलब्ध करून द्यावेत, यासाठी पीएमपी प्रशासनाने १५ दिवसांपूर्वीच दोन्ही आयुक्त कुणाल कुमार आणि श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठविले आहे. तातडीने निधी उपलब्ध होईल, यासाठी प्रक्रिया सुरू करण्याची विनंती पीएमपीने केली आहे. त्यानंतर चार दिवसांपूर्वी दोन्ही आयुक्तांना स्मरणपत्रेही पाठविण्यात आली आहेत. या बस ‘मिडी’ स्वरूपाच्या असल्यामुळे शहरांतर्गत अरुंद रस्त्यांवर वाहतुकीसाठी त्या उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे दोन्ही शहरांतील सुमारे १२ लाख प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र दोन्ही महापालिकांतील प्रशासकीय यंत्रणा किती वेगाने हालचाल करता आणि हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करणार, यावर बस कधी उपलब्ध होतील, यावर त्याचे भवितव्य असेल. 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. पीएमपीच्या ताफ्यात बस दाखल होण्यासाठी आवश्‍यक असलेला २० कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. नव्या बस प्रवाशांसाठी तातडीने दाखल व्हायला हव्यात.
-मुरलीधर मोहोळ,अध्यक्ष- स्थायी समिती, पुणे महापालिका

पीएमपीच्या ताफ्यात पहिल्या टप्प्यातील ६७ मिडी बस उपलब्ध होण्यासाठी सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी लवकरच देण्यात येईल. पिंपरी- चिंचवडमधील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी या बसचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे त्यासाठीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करू. 
-सीमा सावळे, अध्यक्षा- स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका

Web Title: pune news pmpml pmc pcmc