‘पीएमआरडीए’ला स्थानिक जलाशयांतून पाणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

पुण्यात औद्योगीकरण वेगाने वाढत आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या संख्येने लोक पुण्यात येणार आहेत. त्यासाठी पीएमआरडीएचा विकास केला जात आहे. त्यांना तेथे रस्ते देता येतील. पाणी हा असा स्रोत नाही की, पैसे देऊन उपलब्ध करता येईल. पावसातून मिळणाऱ्या पाण्याचे प्रभावी नियोजन झाले पाहिजे,’’
- गिरीश बापट, पालकमंत्री

पुण्याचे पाणी कमी करून नाही, तर त्यात बचत करून पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यातही फक्त खडकवासला प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणार नसून, त्या त्या भागातील जलाशयांमधूनही तो केला जाणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी या बैठकीत स्पष्ट केले. 

‘पीएमआरडीए’ला तीन दशलक्ष घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कालवा समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बापट यांनी याबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, ‘‘महापालिका हद्दीच्या पुढे पाच कि. मी.पर्यंत पाणी देण्याची जबाबदारी सरकारनेच महापालिकेवर टाकली आहे. पुणे वेगाने वाढत आहे. शहराच्या आजूबाजूलाही त्याची वाढ होत आहे. तेथे मोठे गृहनिर्माण प्रकल्प झाले आहेत.

सदनिका बांधून तयार आहेत. पण, तेथे टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यासाठी तेथील नागरिकांना पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे पीएमआरडीएच्या सात हजार चौरस कि. मी. परिसरात पाण्याचे नियोजन आत्तापासूनच करावे लागेल. हे नियोजन करताना फक्त खडकवासला धरणातून पाणीपुरवठा केला जाणार नाही; तर तो पीएमआरडीएच्या त्या त्या भागातील जलाशयांमधून केला जाईल.’’

पीएमआरडीएने तातडीने करावयाचे उपाय
- पाणीसाठा कसा वाढेल हे पाहणे
- तलावातील गाळ काढणे
- कालव्यांची दुरुस्ती करणे
- बंद नळातून पाणीपुरवठा करणे
- पाणीपुरवठ्याची क्षमता वाढविणे
- साठवण क्षमता वाढविणे

पाणी साठवणीचा आराखडा करणार
पीएमआरडीएने पाण्याचे स्रोत निर्माण करून पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी स्वखर्चाने त्याचा आराखडा तयार करावा, अशी सूचनाही बापट यांनी दिली. या आराखड्यामुळे पुणे महापालिकेवरचा भारदेखील कमी होईल. तसेच, पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पात पाण्याच्या नियोजनासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था केली आहे. 

Web Title: pune news pmrda water girish bapat